Skip to main content

Posts

Showing posts with the label India

जखमी वाघाची गर्जना

चेंडू गणिक खोलीतलं वातावरण तंग होत चाललं होतं. 160 च्या आव्हानासमोर भारताचे 5 गडी स्वस्तात तंबूत परतले होते. कोहली आणि पांड्या तेव्हढे टिकून उभे होते. 8 चेंडूत 28 धावा हव्या होत्या. "अगली दो गेंदों पे दो छक्के लग जाये तो फिरभी कितने रन्स बनाने होंगे इनको," अहमद मजेत म्हणला. "सोलह," मी पटकन म्हणलं. "मनहूस, तू पीटने वाले काम मत कर," आमेर त्याला म्हणला. मी खुर्चीत नर्वस बसलो होतो.  चार पाकिस्तानी मित्रांसोबत मी भारत-पाकिस्तान सामना बघत होतो. बे एरियातल्या सनीवेलमध्ये माझी पाकिस्तानी मैत्रीण हुमाकडे मी वीकएंडसाठी आलो होतो. तेव्हा मला भारत-पाकिस्तान T20 विश्वचषकाचा सामना आहे हेही माहीत नव्हतं. सचिन-गांगुली-द्रविड नंतर क्रिकेट बघण्यात फारसा रस उरला नव्हता. हुमाचा नवरा सकाळी म्हणला, "मेरे कुछ दोस्त मॅच देखने मिलने वाले है| आप चलेंगे?" विचार केला च्यायला अशी संधी कधी मिळायची परत. आधीच भारत-पाकिस्तान सामना, त्यात विश्वचषक स्पर्धा, आणि त्यावर कहर म्हणजे एकट्याने पाकिस्तानी चाहत्यांसोबत बसून सामना बघायचा.  "कितने बजे शुरू होना है मॅच," मी विचारलं....

पन्नाच्या पानांमधून - भाग २: जंगल वाचताना

 Welcome, Sir! हसऱ्या चेहऱ्यानं आमचं राणीपूर गावात स्वागत झालं. दुपारचे चार वाजले होते. आमच्या गाडीची वाट पहाट ६ स्थानिक तरुण-तरुणी रस्त्याच्या कडेला उभे होते. जंगल सफारी तर पुढच्या दिवशीपासून सुरू होणार होती. मग इथं नेमकं काय बघायला आलोय याची उत्सुकता लागली होती. "Walk with the Pardhis" अशा नावाचा कार्यक्रम इथे होणार होता इतकंच माहीत होतं.  पारधी समाज हा पारंपारिक दृष्ट्या शिकारीवर अवलंबून असलेला भटका समाज. इतर समाजाने काहीसा वाळीत टाकलेला, गुन्हेगार ठरवून टाकलेला समाज. गावात कोणताही गुन्हा घडला की पहिले पारधी वस्तीवर अटक होणार हे आपल्या समाजातलं करूण वास्तव. "ज्याच्या हाती ससा तो पारधी" अशी म्हणच जिथे रुळली आहे तिथे पारध्याच्या नशिबी "आधी अटक मग चौकशी" हाच न्याय येणार. त्यात नवल ते काय! 😢 आपण आता जंगल कसं बघायचं हे शिकणार आहोत, बीरेन दादाने सांगितलं. आम्ही त्यांच्या पाठोपाठ चालायला सुरूवात केली. "हे आवळ्याचं झाड," "हे खैराचं झाड. पानात कथ्था लावतात ना ते हेच," असं सांगत सांगत त्यांनी आम्हाला एका खड्ड्यापाशी थांबवलं. "हे बघा, हे ...

पन्नाच्या पानांमधून - भाग १: वरद, मला जंगल दाखव ना

वरद, मला जंगल दाखव ना… डिसेंबरच्या सुरुवातीला मी वरदकडे जंगल बघण्याची इच्छा बोलून दाखवली. वरद माझ्याहून ८-९ वर्षं लहान पण माझा जुना मित्र. अत्यंत हुशार आणि स्वतंत्र विचारांचा! शाळेपासूनच त्याने छायाचित्रकला शिकली; जंगलं भटकायला सुरूवात केली. आता जैवविविधता विषयात मास्टर्स करता करता Footloose Journeys सोबत naturalist म्हणून काम करतो. तातडीनं त्यानं तारखा काढल्या; वेळापत्रक बसवलं; आणि आमचा "जंगल बघायला जाण्याचा" पहिलाच धाडसी "पारिवारिक" कार्यक्रम सुरू झाला!   पुणे-मुंबई प्रवासात कुठेतरी… आपण पन्नाला जाऊया, वरदने सुचवलं. पन्ना म्हणजे मध्य प्रदेश मधलं एक अत्यंत सुंदर जंगल. झाशी पासून ४ तासांवर आणि खजुराहोच्या मंदिरांपासून अगदी वीस किलोमीटरवर. विंध्य पर्वतरांगांमध्ये कर्णावती नदीच्या काठाने वसलेलं साधारण १००० वर्ग किलोमीटरचं समृद्ध जंगल! समृद्ध अशासाठी की नदी, डोंगर, आणि पठार अशा तिन्ही प्रकारच्या landscape ने नटलेला भूप्रदेश फार थोडक्या जंगलांना लाभला आहे; पन्ना त्यापैकीच एक.  तेवीस डिसेंबरला पुणं सोडलं. अनेकच वर्षांनी घरच्यांसोबत रेल्वेचा प्रवास करताना मुंबईत वडापाव खा...

संवाद तरुणाईशी: आई-बाबा मला त्रास होतोय

आज एका पालकांशी त्यांच्या तरुण मुलाच्या मानसिक स्वास्थ्य विषयावर बोलण्याचा योग आला. गेली चार वर्षे कमी अधिक फरकाने मुलाचे मानसिक स्वास्थ्य अधून मधून बिघडताना जाणवत होते. एकटेपणा वाटणे, समोर उद्दिष्ट न दिसणे, कंटाळवाणे वाटणे, कशातही आनंदी न वाटणे, या विचारांनी डोकं बधिर होणे, उदास वाटणे, या सगळ्याबद्दल स्वतःला अपराधी मानणे अशा तक्रारी तो मला अधून मधून सांगत असे. या सगळ्यात पॅटर्न दिसायला लागल्यावर मी त्याला समुपदेशिकेकडेही जायला सांगितले. पण तेही त्याने नंतर बंद केले. गेल्या काही दिवसात त्रास वाढायला लागल्यावर मात्र त्याने घरी सांगितले पाहिजे याबद्दल मी आग्रह धरला. "घरचे काय म्हणतील", "ते काय मदत करू शकतील", "उलट मलाच दोष देतील" या विचारांनी तो घरी सांगायला तयार होईना. "तुझे पालक आहेत ते; समजावून सांगितलं तर नक्की समजावून घेतील; त्यांना संधी तर दे," असं सांगून त्याला तयार केलं. पण बोलायचं कसं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. प्रत्यक्ष बोलणं जड जाणार असेल तर कोणाच्या तरी माध्यमातून बोल किंवा पत्र लिही असं सुचवलं. त्यानुसार त्याने एक whatsapp संदेश तयार...

ज्ञा पु, ही चिटिंग आहे..

प्रिय ज्ञा पु, सप्रेम नमस्कार! आज तुम्हाला हे पत्र लिहिताना मनात खूप अस्वस्थता आहे. वेळ जणू काही मंदावला आहे. आज दिवसभर सतत मनात तुमच्या आठवणींनी काहूर माजलं होतं. आजवर तुमच्याशी बोलताना कधीच संकोच वाटला नाही, पण आज हे पत्र लिहिताना मात्र शब्द अडकतायेत. मागच्या महिन्यात आपण तुमच्या वाढदिवसाला बोललो. किती उत्स्फूर्तपणे तुम्ही "धन्यवाद बंधू आकाश" अशी साद घातली होतीत. कसं जमायचं तुम्हाला असं कोणालाही आपलंसं करून टाकायला? मेच्या शेवटच्या आठवड्यात तर आपण शिबिराला भेटलो. एका मेसेजवर तुम्ही शिबिरात विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला तयार झालात. स्व-रूपवर्धिनी सारख्या मोठ्या संस्थेचे कार्यवाह असूनही तुम्ही एका मेसेजवर "हो" म्हणलात. तुम्हाला एका साध्या फोनचीही अपेक्षा नाही वाटली? कुठून येतो हा साधेपणा? कसं जमतं अशा सर्व जगाला व्यापून उरलेल्या अहंचा त्याग करणं? तुमचा प्रतिसादही मला लाजवणारा होता. तुम्ही उत्तरात लिहिलंत, "अरे जरूर आकाश. आप सिर्फ आज्ञा करो. बंदा हाजीर. 😄" अहो ज्ञा पु, कोण असं इतकं स्वतःवर हक्क गाजवून घेतं? मी तुमच्याहून २० वर्षांनी लहान. तुमच्या कार्य कर्...

बाकरवडी ते बरीटो - भाग १०: बरीटोशी गट्टी

ठाण्याच्या अलीकडे गाड्यांची ही प्रचंड गर्दी. विमानतळावर जाण्यापूर्वी ठाण्याच्या मामाला भेटायचं आणि मग रवाना व्हायचं, असं ठरलं होतं. पण ही गर्दी बघता विमान चुकतंय का काय अशी भीती वाटायला लागली होती. त्यातच शेजारच्या धसमुसळ्या चालकाने आमची गाडी घासली आणि आरश्याचा चुराडा झाला. गाडीतला ताण हळूहळू वाढत चालला होता...अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती...त्यातही वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचे प्रयत्न आईकडून चालूच होते! ठाण्याला पोचलो तेव्हा घराच्या बाहेरच पवईचा अनुप भेटला. अनेक तास वाट बघून कंटाळला होता बिचारा. खरगपूरहून रत्नदीप येऊ शकणार नव्हता. अनुप, रत्नदीप, सौरभ, पुष्कर म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षातले सर्वात जवळचे साथीदार. त्यांनी मिळून एक भेटवस्तू आणली होती. ती देण्यासाठी रात्रीच्या अपप्रहारी अनुप ठाण्याच्या अनोळखी गल्लीत वाट बघत उभा होता. मामाचा निरोप घेऊन विमानतळावर पोचलो. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचा तो रुबाबच अजब! अनेक मित्रांनी माझ्याआधी यापूर्वी तिथून जड निरोप घेतला होता. त्या सर्वांच्या मनात भावनांची काय गर्दी त्या क्षणी झाली असेल याचा अनुभव मी घेत होतो. भव्य कमानींच्या प्रवे...

बाकरवडी ते बरीटो - भाग ९: निरोप

बंगाल दौऱ्याहून परतल्यावर मी प्रबोधिनीतील कामाचा तांत्रिक राजीनामा दिला. गेल्या वर्षभरातल्या घडामोडी झरझर डोळ्यासमोरून जात होत्या. गणपती बाप्पाचं विसर्जन, त्यानंतर जेमतेम वीस दिवसांत केलेली GRE च्या परीक्षेची तयारी, धावपळ करत गाठलेल्या अर्जांच्या डेडलाईन्स, कोलंबिया विद्यापीठाचा थरार, पर्ड्यू की कोलंबिया हे ठरवण्यात झालेली मानसिक ओढाताण, अरुणाचल प्रदेशचा एक भावपूर्ण दौरा, दलासोबत केलेला मणिपूर-बंगालचा प्रवास, ब्रह्मपुत्रेचं प्रेमपत्र, आणि गंगेचा अवघड निरोप! निरोप, किती अवघड गोष्ट! आपल्या हृद्य लोकांचा, इथल्या गुंफलेल्या नात्यांचा, या गंधभरल्या जमिनीचा, चविष्ट जेवणाचा एकाएकी निरोप.. पलीकडे काहीतरी मोठं खुणावत असताना हातातला रंगलेला डाव मोडून त्या अनागताच्या मागे जाण्यासाठी एकदा मागे वळून बघणं आणि पुन्हा तोच जुना डाव तसाच आधीसारखा रंगवायला मिळेल का नाही याची हूरहूर अनुभवणं हा मोठा अवघड प्रकार आहे. खुणावणाऱ्या पैलतीरासाठी ऐलतीर सोडण्याची भीती आणि पलीकडच्या गावी वाढून ठेवलेल्या अदृश्य शंकांचं एक भलंमोठं काहूर! तेवीस जुलैला व्हिसाच्या मुलाखतीचे सोपस्कार पार पडले आणि मन घट्ट करून १४ ऑगस...

बाकरवडी ते बरीटो - भाग ८: भागलपूरचा भामटा

आमचं गंगास्वप्न पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. बंगालमधून पुण्याकडे परतणारे गट कायम रात्री १० वाजताची आझाद हिंद एक्स्प्रेस पकडून रायपूर-नागपूरमार्गे पुण्याला पोचतात. परंतु आम्हाला काहीतरी वेगळा अनुभव घेण्याची खुमखुमी असल्याने (अंगातले कीडेच म्हणू शकता) आम्ही फरक्काला गाडी पकडून बिहार, उत्तर प्रदेश मार्गे मुंबई गाठायची असं ठरवलं होतं. जेवण उरकून रेल्वे स्थानकाकडे निघणार तेव्हाच गाडी १२ तास उशिरा येणार असल्याचं समजलं. म्हणजे आता संपूर्ण रात्र त्या निर्मनुष्य स्थानकावर काढायची किंवा मालदाकडे उलट जाऊन तिथे वाट पहात बसायचं असे दोन पर्याय समोर होते. रात्री बाराच्या आसपास आम्ही पुढच्या गाडीत जनरलच्या डब्यात चढलो आणि मालदा स्थानक गाठलं. प्रतीक्षाकक्षात वेळ काढत रात्र कशीबशी पुढे सरकली. दर काही तासांनी गाडीची चौकशी करून यायचं, 'कुछ पता नही' हेच उत्तर पुन्हा ऐकायचं, आणि कधीही आपली गाडी येईल आणि आपल्याला न घेताच निघून जाईल अशा अनावश्यक भीतीने अस्वस्थ व्हायचं हे चक्र चालूच होतं. मरणप्राय कंटाळा! अखेर दुपारी कधीतरी गाडी आली आणि अखेर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. वाट बघून दमलेल...

बाकरवडी ते बरीटो - भाग ७: जैसे बरसों में कोई गंगा नहाए

६ जून २०१८. मणिपूरच्या डोंगरांमधून बाहेर पडलो तेव्हा ४ दिवसांनी मोबाईलला रेंज मिळाली. गटाचा निरोप घेऊन एकट्यानेच परतीचा प्रवास सुरु केला. पुढचा मुक्काम नागालँडच्या दिमापूरला होता. इथल्या छात्रावासात १३ वर्षांपूर्वी राहिल्याच्या उत्कट आठवणी सोबत होत्या. तेव्हा दिमापूरमध्ये पावसाने चांगलाच झोडपून काढला होता आम्हाला. रेल्वे स्थानकावर स्थानिक गुंडांनी दिलेली दहशत अजूनही मनात ताजी होती. दिमापूर म्हणजे घटोत्कचाचे शहर. इथल्या राजबाडीतील दगडी प्यादे म्हणजे घटोत्कच आणि भीमाचा बुद्धिबळाचा पट होता म्हणे! त्या दिमापूरात मला आज एक महत्वाचं काम उरकायचं होतं - व्हिसाचा अर्ज. हो, एकीकडे निवांत भारतभ्रमण चालू असताना मी अजूनही व्हिसाचा अर्ज केला नव्हता. अमेरिकेची स्वप्नं काही अजूनही पडत नव्हती आणि व्हिसा म्हणजे तर शेवटचा प्रहार होता. तिथून माघार नव्हती. मग आज करू, उद्या करू, म्हणून टाळंटाळ चालली होती. पण आता अर्ज केला नाही तर तारीख मिळूनही वेळेत व्हिसा हातात येणार नाही हे लक्षात आल्यावर हे काम दिमापूरमध्ये पूर्ण करायचं असं  ठरवूनच मणिपूर सोडलं होतं. गावभर फिरून शबनमचं मोठं खोकं खरे...

बाकरवडी ते बरीटो - भाग ६: भारतातील शेवटचे गाव

बाकरवडी ते बरीटो लेखमाला लिहायला घेताना केवळ आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा प्रामाणिक हेतू मनात होता. भारतातील सर्वकाही तात्पुरता मागे सोडून पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला येण्याचा हा प्रवास आपल्या सर्वांशी संवादाच्या माध्यमातून वाटून घेताना खूप मजा आली. लिहिता लिहिता स्वतःचा प्रवास पुन्हा जवळून बघायला मिळाला. त्या सर्व कटू-गोड आठवणी आपल्या सर्वांसोबत वाटून घेताना आपल्या अनेक बोलक्या प्रतिक्रिया आल्या. त्यातूनच लिहिण्याची उमेद वाढली. आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. हा भाग ७० दिवसांच्या खंडानंतर लिहितोय. त्याबद्दल प्रथम माफी मागतो. जीआरईची परीक्षा आणि अर्जांची प्रक्रिया संपली. ७ नकार आणि २ होकार असे गणित समोर ठेवून मनाचा गुंता सोडवताना जरा दमछाक झाली. पर्ड्यू आणि कोलंबिया द्वंद्वाचा निकाल लावून पुण्यातला गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान अरुणाचल प्रदेशचा एक दौरा झाला. तिथल्या विद्यार्थ्यांचा निरोप घेताना झालेली घालमेल आणि ब्रह्मपुत्रेचा परत फिरण्याचा आदेश घेऊन पुण्यात परतलो. अरुणाचल हा मनातला एक हळवा कोपरा परंतु त्याहूनही खोलवर रुजलेला आणि गेल्या २० वर्षा...

बाकरवडी ते बरीटो - भाग ५: ब्रह्मपुत्रेचे प्रेमपत्र

आज मी थोडा मागे जाणार आहे. पर्ड्यू कि कोलंबिया या द्वंद्वाचा निकाल लागेना तेव्हा 'परत आल्यावर बघू' असे म्हणून मी अरुणाचलला निघून गेलो. निर्णय काहीही झाला तरी अमेरिकेला जाण्यापूर्वी अरुणाचलचा हा शेवटचा दौरा ठरणार अशी मनात धाकधूक होती. गेल्या ३ वर्षांत मी अरुणाचलचे ७ दौरे केले होते. तिथल्या मुलांसाठी प्रज्ञा विकास कार्यक्रम राबवत असताना त्या निसर्गभूमीशी खूप जवळचे नाते जडले होते. विशालकाय ब्रह्मपुत्र, रोइंगची नितळ देवपानी नदी, झिरोचे ते खुणावणारे डोंगर, मिचमिच्या डोळ्यांची लाजरीबुजरी पोरं, त्यांचं ते विशेष हिंदीतून बोलणं, आपल्यावर जीवापाड प्रेम करणं आणि कधीच ते व्यक्त न करता येणं हे सगळं माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेलं होतं. हे सगळं मागे सोडून यायचं या कल्पनेनीच मला कसंतरी होत होतं. गुवाहाटी रेल्वे स्थानकावरून सोनलताई, मृण्मयी, स्वरूपाचा निरोप घेताना सगळं एकदम भरून आलं आणि तिथेच स्पष्ट झालं होतं की आपलं काही खरं नाही. अरुणाचलच्या सुदूर पूर्वेला रोइंग नावाचे शहर आहे. भारताच्या सीमावर्ती भागातल्या विवेकानंद केंद्राच्या ७ शाळांचे विद्यार्थी तिथे वर्षातून ३ वेळा शिबिरां...