वरद, मला जंगल दाखव ना…
डिसेंबरच्या सुरुवातीला मी वरदकडे जंगल बघण्याची इच्छा बोलून दाखवली. वरद माझ्याहून ८-९ वर्षं लहान पण माझा जुना मित्र. अत्यंत हुशार आणि स्वतंत्र विचारांचा! शाळेपासूनच त्याने छायाचित्रकला शिकली; जंगलं भटकायला सुरूवात केली. आता जैवविविधता विषयात मास्टर्स करता करता Footloose Journeys सोबत naturalist म्हणून काम करतो. तातडीनं त्यानं तारखा काढल्या; वेळापत्रक बसवलं; आणि आमचा "जंगल बघायला जाण्याचा" पहिलाच धाडसी "पारिवारिक" कार्यक्रम सुरू झाला!
| पुणे-मुंबई प्रवासात कुठेतरी… |
आपण पन्नाला जाऊया,
वरदने सुचवलं. पन्ना म्हणजे मध्य प्रदेश मधलं एक अत्यंत सुंदर जंगल. झाशी पासून ४ तासांवर आणि खजुराहोच्या मंदिरांपासून अगदी वीस किलोमीटरवर. विंध्य पर्वतरांगांमध्ये कर्णावती नदीच्या काठाने वसलेलं साधारण १००० वर्ग किलोमीटरचं समृद्ध जंगल! समृद्ध अशासाठी की नदी, डोंगर, आणि पठार अशा तिन्ही प्रकारच्या landscape ने नटलेला भूप्रदेश फार थोडक्या जंगलांना लाभला आहे; पन्ना त्यापैकीच एक.
तेवीस डिसेंबरला पुणं सोडलं. अनेकच वर्षांनी घरच्यांसोबत रेल्वेचा प्रवास करताना मुंबईत वडापाव खायला विसरलो नाही! वरदने आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून काहीतरी खुडबुड केली, आणि जळगावला डब्यात पार्सल घेऊन माणूस हजर! हे अजबच होतं. प्रवासातल्या कोणत्याही स्टेशनवर स्थानिक हॉटेलमध्ये ऑनलाइन ऑर्डर दिली की त्यांचा माणूस जेवण घेऊन डब्याशी येतो म्हणे. ही नवीन सुविधा फारच सोयीची आहे.
राजधानी एक्सप्रेसने प्रवास करून चोवीस डिसेंबरला पहाटे झाशीत उतरलो. रस्त्याच्या कडेला "कुल्हण चाय" (मातीच्या पेल्यातील चहा) आणि आलू पराठ्याचा नाश्ता घेऊन पन्नाला पोचलो. रस्ताही अतिशय सुंदर! मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश बद्दलचे जुने ग्रह गळून पडायला लागले. खरंच, "मेरा देश बदल रहा है" चा अनुभव यायला लागला. कुडकुड थंडीत अर्धवट पेंगत पन्नात पोचलो.
| कुल्हण चाय पिऊन टवटवीत झालेले प्राणिमात्र |
Greetoe नावाच्या रिसॉर्टला मुक्काम होता. कर्णावती नदीच्या किनारी झाडांच्या सानिध्यात वैशिष्ट्यपूर्ण रचना केलेलं रिसॉर्ट आणि तिथलं प्रेमळ स्वागत बघून पहिल्याच नजरेत रिसॉर्टच्या प्रेमात पडलो. खोलीतही न जाता थेट नदीवर गेलो. निळीशार नदी आणि त्यातील मोठमोठ्या शिळा बघून हरखून गेलो. पैलतीरावर दिसणाऱ्या विस्तीर्ण घनदाट जंगलाकडे बघताना तंद्री लागली.
| Greetoe रिसॉर्ट मधून दिसणारी कर्णा वती नदी आणि पन्नाचे जंगल |
तितक्यात डोक्यावरच्या झाडामधून मोठा आवाज आला. वजनदार उड्या मारत एक लंगूर माझ्या दिशेनं येत होतं. एक क्षण छातीत धडकी भरली. शक्य तितक्या वेगाने मी १०-१५ पावलं मागे झालो, आणि तिथेच मला पुढच्या चार दिवसांची पहिली झलक मिळाली. (क्रमशः)
बब्बू
२८ डिसेंबर २०२१
सगळी छायाचित्रं - अंतरा चौकसे
बब्बूची बडबड छानच ,पन्नाचे छान लिखाण व वर्णन आवडले
ReplyDeleteधन्यवाद नानू! :)
Deleteअपत्रिम व तुम्ही छान पर्यटन ठिकन निवडले व आनंदी आहे तुमचे अनुभवा चे छान लिखण केले अभिमान आहे
ReplyDeleteधन्यवाद, मामा!! :)
Delete