चेंडू गणिक खोलीतलं वातावरण तंग होत चाललं होतं. 160 च्या आव्हानासमोर भारताचे 5 गडी स्वस्तात तंबूत परतले होते. कोहली आणि पांड्या तेव्हढे टिकून उभे होते. 8 चेंडूत 28 धावा हव्या होत्या. "अगली दो गेंदों पे दो छक्के लग जाये तो फिरभी कितने रन्स बनाने होंगे इनको," अहमद मजेत म्हणला. "सोलह," मी पटकन म्हणलं. "मनहूस, तू पीटने वाले काम मत कर," आमेर त्याला म्हणला. मी खुर्चीत नर्वस बसलो होतो.
चार पाकिस्तानी मित्रांसोबत मी भारत-पाकिस्तान सामना बघत होतो. बे एरियातल्या सनीवेलमध्ये माझी पाकिस्तानी मैत्रीण हुमाकडे मी वीकएंडसाठी आलो होतो. तेव्हा मला भारत-पाकिस्तान T20 विश्वचषकाचा सामना आहे हेही माहीत नव्हतं. सचिन-गांगुली-द्रविड नंतर क्रिकेट बघण्यात फारसा रस उरला नव्हता. हुमाचा नवरा सकाळी म्हणला, "मेरे कुछ दोस्त मॅच देखने मिलने वाले है| आप चलेंगे?" विचार केला च्यायला अशी संधी कधी मिळायची परत. आधीच भारत-पाकिस्तान सामना, त्यात विश्वचषक स्पर्धा, आणि त्यावर कहर म्हणजे एकट्याने पाकिस्तानी चाहत्यांसोबत बसून सामना बघायचा.
"कितने बजे शुरू होना है मॅच," मी विचारलं. "रात एक बजे!" बस्स, ही संधी सोडायची नाही, ठरलं. आम्ही 9 वाजताच अलार्म लावून झोपलो. उठून बसेपर्यंत पाकिस्तानचे दोन्ही ओपनर बाद झाले होते. "पाकिस्तान का ठीक स्कोर बना तोही दोस्तों के पास चलेंगे," आमेर म्हणला. त्यांनी 160 ठोकले तेव्हा उत्साहात आमेर मला मित्रांकडे घेऊन गेला. "वैसे हमारे लडके थोडे जज़्बाती है," त्याने मला आधीच सतर्क केलं. सामन्याचा निकाल काय लागेल याबद्दल आता मला पहिल्यांदा खऱ्या अर्थाने घालमेल वाटायला लागली.
आम्ही पोचलो तोपर्यंत भारताची फलंदाजी सुरू झाली होती. खोलीत शिरतानाच मला वातावरणाचा अंदाज आला. प्रत्येक चेंडूवर खोलीत धावतं समालोचन चालू होतं. एखादा खराब चेंडू टाकला तर स्वतःच्या गोलंदाजांना शिव्या घालणं, एखादी धाव घेतली तरी फलंदाज आऊट होण्यासाठी प्रार्थना करणं. मी खोलीत आहे याचं भान ठेवून त्यांचं प्रयत्नपूर्वक भावना काबूत ठेवणं चालू होतं. तरी सुद्धा अधूनमधून आई-माई निघतच होती. राहुल-रोहित सुरूवातीलाच बाद झाल्यावर त्यांच्या आशा एकदम वाढल्या होत्या. सूर्यकुमारने एक-दोन मोठे फटके मारल्यावर मला जरा हायसं वाटलं, पण तोही बाद झाला. लगेचच अक्षर धावचीत झाला, आणि खोलीत एकच जल्लोष झाला. "पचास के अंदर निपटने वाले है यह लोग," हसामला एकाचा फोन आला, त्यावर तो उत्साहाने म्हणला.
इथे माझी अवस्था वाईट झाली होती. 31 वर 4. "संपला सामना, खतम," मनात नकारात्मक विचार यायला लागले. विकेट पडू नये इतकीच प्रार्थना चालू होती. कोहली-पांड्या जोडी सावधपणे खेळत असली तरी अजून खूपच पल्ला बाकी होता. रनरेट दहाच्या वर गेला होता. गोलंदाजी ही पाकिस्तान क्रिकेटची कायमच जमेची बाजू असल्यामुळे उरल्यासुरल्या आशा या जोडीवर टिकून होत्या. यातला एखादा बाद झाला तर पुढे फक्त दिनेश कार्तिक आणि आश्विन. अवघड वाटत होतं. आणि खोलीत तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. "भाई, 150 की रफ्तार से गेंद जब निकलती है ना, दिखती नही है| आखरी के ओवर्स में जब फास्ट बोलर आने है, यह रन तो नही बनने वाले इनसे," अहमद म्हणला. मी गप्पच.
पहाटेचे चार वाजले होते. आमेरने चहा टाकला. कोहली-पांड्या अजून टिकून होते. धावफलक हलता होता. माझ्या आशा हलक्या हलक्या वाढायला लागल्या तशी खोलीत हळूहळू चुळबुळ व्हायला लागली. "Kohli, we respect you a lot, लेकिन अब आऊट हो जा भाई." आमेर किचनमधूनच बोलला. "यह मॅच हमको जितने दो भाई," हसाम भावनिक होऊन बोलला. "मेरी तो डिप्रेशन की दवाई चालू है, भाई. ऐसा ना करो," अहमद काहीतरी औषध घ्यायला खोलीत गेला. मी खुर्चीतून हलण्याचा प्रश्नच नव्हता. कसाबसा चहा संपवला.
सोळाव्या आणि सतराव्या षटकात फक्त सहा-सहा धावा निघाल्या आणि रिक्वायर्ड रनरेट सोळावर गेला. एका मोठ्या षटकाची गरज होती. पुढच्या षटकात शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर तुटून पडण्याशिवाय दूसरा काही पर्यायच नव्हता. कोहलीने तीन सणसणीत चौकार ठोकले, आणि सतरा धावा वसूल केल्या. खोलीत आता तणाव स्पष्टपणे दिसायला लागला होता. हसाम येरझाऱ्या घालायला लागला. आतापर्यंत शांतपणे सोफ्यावर बसलेला सजाद जमीनवर डोकं धरून बसला. शेवटून दुसरी ओवर टाकायला पाकिस्तानचा सर्वात भारी गोलंदाज हरिस रौफ समोर आला. म्हणजे शेवटची ओवर फिरकी गोलंदाज नवाझ टाकणार हे स्पष्ट झालं. अजूनही 31 धावांची गरज होती.
एकोणीसावे षटक सुरू झाले. पहिल्या चार चेंडूवर रौफने फारशा धावा दिल्या नाहीत. 8 चेंडूत 28! "अहमद म्हणतोय तसे दोन षटकार बसले पाहिजेत यार," मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो. सिक्स! सिक्स! आणि अशक्य वाटावे असे दोन फटके कोहलीच्या बॅटमधून निघाले. समोर काय घडतंय, आपण काय बघतोय काहीही सुधरत नव्हतं. खोलीत चिडीचूप शांतता झाली. कोणालाही कोण जिंकेल याची खात्री वाटत नव्हती.
आता शेवटचं षटक! सोळा धावांची गरज असताना पांड्या काय करेल याकडे डोळे लागले होते. आणि पहिल्याच चेंडूवर पांड्या बाद. बोंबला. पाच चेंडूत सोळा धावा. त्यात नवीन फलंदाज स्ट्राइकवर. पुढच्या चेंडूवर फॉर्मात असलेल्या कोहलीकडे स्ट्राइक आली. "ओ पालनहारे.. तुम्हरे बिन हमरा कोई नही|" खोलीत सगळेच श्वास धरून बसले होते. आणि चौथ्या चेंडूवर चमत्कार! स्पिनर नवाझचा नो बॉल आणि त्यावर कोहलीचा कडक षटकार. एका चेंडूत सात धावा आणि फ्री हिट! इथे मात्र खोलीत एकच माणूस हसत होता. बाकी मायूसी. निकाल स्पष्ट झाला होता. किमान तसं वाटायला तरी लागलं होतं.
मग एक वाइड पडला, आणि फ्री हिट चालूच राहिला. "खतम करो यार, बस हो गया अब," खोलीत एक चिडकी प्रतिक्रिया उमटली. पुढच्या चेंडूवर कोहलीचा त्रिफळा उडला काय, पाकिस्तानी खेळाडू पंचांशी बोलण्यात गुंतले काय, फ्री हिट असल्याने कोहलीने तीन धावा चोरल्या काय. सगळंच अद्भुत, अविश्वसनीय. आता फक्त दोन चेंडू दोन धावा. ईझी पिझी.
आपल्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे असं वाटेपर्यंत कार्तिक बाद झाला, आणि पोटात गोळा आला. सामना पुन्हा फिरला होता. नवीन फलंदाज आश्विनला शेवटच्या चेंडूवर दोन धावा जमणार का? जिंकणार, हारणार, की टाय होणार? खोलीत जाम प्रेशर. मी हळूच विडियो रेकॉर्ड करायला फोन हातात घेतला. नवाझने बाहेर टाकलेला चेंडू आश्विनने हुशारीने सोडला. वाईड! सामना बरोबरीत आला.
आता शेवटचा चेंडू. बहुतेक सगळे खेळाडू गोलातच उभे. अशा परिस्थितीतही डोकं शांत ठेवून आश्विनने मिड ऑफ वरून चेंडू उचलला, आणि मेलबर्नच्या त्या भल्यामोठ्या मैदानात नव्वद हजार चाहत्यांनी एकच जल्लोष केला. "शेवटच्या चेंडूवर भारताचा रोमहर्षक विजय," "मेलबर्नमध्ये भारताने साजरी केली दिवाळी" वगैरे मथळे डोळ्यासमोर दिसायला लागले.
![]() |
| सौजन्य: AFP |
किंग कोहलीच्या खेळीने अशक्य ते शक्य करून दाखवले. फॉर्मशी झगडत असलेल्या जखमी वाघाने अशी काही गर्जना केली की करोडो भारतीयांसोबत त्या वाघाचेही डोळे पाणावले. धन्य धन्य. आपली तर बातच सोडा, त्यालाही बोलायला काही शब्द फुटेनात. खोलीतले पाकिस्तानी चेहरे पडले. "दोन षटकार पडले तर.. " म्हणणारा अहमद आमेरचा मार खाणार असं वाटायला लागलं. हसामला तर रडू आवरेना. शेवटी तो घरातून बाहेरच गेला. तिथून निघण्यापूर्वी आठवण म्हणून एक सेल्फी घेऊया असं मी थोडं जपूनच, अंदाज घेत घेतच म्हणलो. हो-नाही करत उभ्या उभ्याच एक फोटो काढला. फोटोतही अर्थात एकच माणूस हसत होता! कोहली, भावा, थॅंक यू!
23 ऑक्टोबर 2022
सनीवेल, कॅलिफोर्निया

दादा ,ती selfie बागायची उत्सुकता लागली आहे अत्ता😅.
ReplyDeleteचपराक बसली असेल भाऊ मागची चूक ही मुलं नाही करणार शेवटी ही मुलं धोनीच्या तालमीत तयार झाली आहे
ReplyDeleteफार मस्त लिहिले आहे ....अती सुंदर वर्णन
Deleteसेल्फी प्लीज
ReplyDeleteफारच भारी
ReplyDeleteभारी!
ReplyDelete