वरद, मला जंगल दाखव ना… डिसेंबरच्या सुरुवातीला मी वरदकडे जंगल बघण्याची इच्छा बोलून दाखवली. वरद माझ्याहून ८-९ वर्षं लहान पण माझा जुना मित्र. अत्यंत हुशार आणि स्वतंत्र विचारांचा! शाळेपासूनच त्याने छायाचित्रकला शिकली; जंगलं भटकायला सुरूवात केली. आता जैवविविधता विषयात मास्टर्स करता करता Footloose Journeys सोबत naturalist म्हणून काम करतो. तातडीनं त्यानं तारखा काढल्या; वेळापत्रक बसवलं; आणि आमचा "जंगल बघायला जाण्याचा" पहिलाच धाडसी "पारिवारिक" कार्यक्रम सुरू झाला! पुणे-मुंबई प्रवासात कुठेतरी… आपण पन्नाला जाऊया, वरदने सुचवलं. पन्ना म्हणजे मध्य प्रदेश मधलं एक अत्यंत सुंदर जंगल. झाशी पासून ४ तासांवर आणि खजुराहोच्या मंदिरांपासून अगदी वीस किलोमीटरवर. विंध्य पर्वतरांगांमध्ये कर्णावती नदीच्या काठाने वसलेलं साधारण १००० वर्ग किलोमीटरचं समृद्ध जंगल! समृद्ध अशासाठी की नदी, डोंगर, आणि पठार अशा तिन्ही प्रकारच्या landscape ने नटलेला भूप्रदेश फार थोडक्या जंगलांना लाभला आहे; पन्ना त्यापैकीच एक. तेवीस डिसेंबरला पुणं सोडलं. अनेकच वर्षांनी घरच्यांसोबत रेल्वेचा प्रवास करताना मुंबईत वडापाव खा...