Skip to main content

बाकरवडी ते बरीटो - भाग ६: भारतातील शेवटचे गाव

बाकरवडी ते बरीटो लेखमाला लिहायला घेताना केवळ आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा प्रामाणिक हेतू मनात होता. भारतातील सर्वकाही तात्पुरता मागे सोडून पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला येण्याचा हा प्रवास आपल्या सर्वांशी संवादाच्या माध्यमातून वाटून घेताना खूप मजा आली. लिहिता लिहिता स्वतःचा प्रवास पुन्हा जवळून बघायला मिळाला. त्या सर्व कटू-गोड आठवणी आपल्या सर्वांसोबत वाटून घेताना आपल्या अनेक बोलक्या प्रतिक्रिया आल्या. त्यातूनच लिहिण्याची उमेद वाढली. आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. हा भाग ७० दिवसांच्या खंडानंतर लिहितोय. त्याबद्दल प्रथम माफी मागतो.

जीआरईची परीक्षा आणि अर्जांची प्रक्रिया संपली. ७ नकार आणि २ होकार असे गणित समोर ठेवून मनाचा गुंता सोडवताना जरा दमछाक झाली. पर्ड्यू आणि कोलंबिया द्वंद्वाचा निकाल लावून पुण्यातला गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान अरुणाचल प्रदेशचा एक दौरा झाला. तिथल्या विद्यार्थ्यांचा निरोप घेताना झालेली घालमेल आणि ब्रह्मपुत्रेचा परत फिरण्याचा आदेश घेऊन पुण्यात परतलो. अरुणाचल हा मनातला एक हळवा कोपरा परंतु त्याहूनही खोलवर रुजलेला आणि गेल्या २० वर्षांत रोजच्या जगण्याचा अविभाज्य झालेला भाग म्हणजे दल. बेंगळूरूहून शिक्षण पूर्ण करून पुन्हा पुण्यात आल्यावर बोस दलाची सुरुवात केली. वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकणारे "मोठे" झालेले युवक बोस दलावर एकत्र आले. त्यासर्वांना मजा येईल आणि तरीही आव्हानात्मक असतील असे कार्यक्रम बोस दलावर सुरु झाले. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे अभ्यास दौरे. भारताच्या नकाशावर कुठेही बोट ठेवायचं आणि तिथली परिस्थिती समजून घेण्यासाठी १०-१५ दिवस त्या भागात भटकायचं, असा हा साहसी प्रकार. २०१६ ला छत्तीसगडच्या बस्तर भागात तर २०१७ ला ओडीशाच्या आदिवासी जंगलात दौरे काढले. अमेरिकेला जाण्यापूर्वी अजून एक खबदाडीतला प्रदेश पायाखालून घालायचा अशी खाज डोक्यात होतीच. बोस दलाचा साहाय्यक प्रतोद अनिरुद्ध वाघ म्हणजेच "टोनी" याच्याशी चर्चा केली आणि पूर्वोतर सीमेवरच्या नागालँड आणि मणिपूरला जायचं ठरलं. १६ प्रबोधकांना सोबत घेऊन आमचा ईशान्येचा दौरा सुरु झाला.

२७ मे २०१७ चा दिवस. पुणे रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी टोनी माझ्या घरी येऊन पोचला तरी हातातली कामं काही संपली नव्हती. जुन्या बाजाराच्या गर्दीतून कशी बशी वाट काढत गाडी पकडली आणि हुश्श केले. पुढचा प्रवास हा साधारण साडेतीन हजार किलोमीटरचा म्हणजेच पाच दिवसांचा होता. तिसऱ्या दिवशी कोलकत्याला पोचलो. बेलूरच्या रामकृष्ण मठात डोकं ठेवलं आणि पुढे नागालँडकडचा रेल्वे प्रवास सुरु झाला. मध्य भारतातला रखरखाट मागे टाकून हिरव्यागार सुजलाम सुफलाम बंगालमधला प्रवास सुरु होताच भारताच्या समृद्धीचं दर्शन झालं. खिडकीतून क्षितिजापर्यंत दिसणारी भातशेती, झरे आणि नद्या, छोटीछोटी बांबूची घरं आणि त्यांच्यासमोरील छोट्याश्या तलावात पडणारे सूर्याचे ते मोहक प्रतिबिंब! रात्री उशिरापर्यंत जागून फरक्केला अजस्त्र गंगेचं दर्शन घेऊन झोपताना पुढच्या दिवशीच्या गुवाहाटीच्या ब्रह्मपुत्रेचं स्वप्न पडू लागलं. हवेतला गारवा वाढत चालला होता.

चौथ्या रात्री उशिरा आमची गाडी नागालँडच्या दिमापूरला पोचली. इथून पुढचा प्रवास करण्यासाठी म्हणजे कोहिमा आणि इंफाळ गाठण्यासाठी अजूनही रेल्वेमार्ग नसल्याने पुढचा प्रवास रस्त्याने होणार होता. पहाटेच गाडी गाठली आणि नागालँडच्या नयनरम्य डोंगरांमधून इम्फाळच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. पावसाळी वातावरण, दूरवर दिसणाऱ्या डोंगररांगा आणि अतिशय अवघड असा हा नागांचा भूप्रदेश! मणिपूरच्या सीमेवर माओ नावाचे गाव लागते. तिथल्या टोलनाक्यावर सर्वांची ओळखपत्र तपासून मणिपूरमधील प्रवेशाचा परवाना दिला गेला. अमृतसोबत एक गट माओ नागांच्या गावांमध्ये अभ्यासासाठी गेले. बाकी गट इंफाळकडे पुढे सरकला. तो दिवस संपवताना रात्री ८ वाजताच इंफाळ शहर कडकडीत बंद झाले होते. रस्त्यावर आता फक्त वावर होता तो सुरक्षा दलातील जवान आणि पोलिसांचा. होय, मणिपूरच्या राजधानीतील दोन मुख्य आव्हाने म्हणजेच विभाजनवादी विचारांच्या अतिरेकी संघटना आणि म्यानमार सीमेवरील स्थलांतरित रोहिंग्या. रात्रीच्या इम्फाळला लष्करी छावणीचे स्वरूप येते ते या दोन्हीमुळे अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे.

मणिपूरच्या मध्यवर्ती १० टक्के समतल भागात मैतेई हिंदू समाजाचे तर उर्वरित ९० टक्के डोंगराळ भागात ख्रिस्तीकरण झालेल्या नागा आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. दोघांच्याही रिती-परंपरांमध्ये टोकाची भिन्नता आहे. त्यांच्यातील एकमेकांविषयी द्वेषाची भावना इथल्या फुटीरतावादी चळवळीला खतपाणी घालण्याचेच काम करते. आमच्या गटाचे तीन छोटे गट करून आम्ही पुढच्या चार दिवसांसाठी तीन वेगवेगळ्या दिशांना डोंगराळ नागांमध्ये गेलो. त्यातील आम्ही पाच जण तर अतिशय कल्पनातीत असा प्रवास करून उखरूलमार्गे म्यानमार सीमेवरील खारासोमला पोचलो. उखरूलपर्यंत जाण्यासाठी एक प्रवासी वाहन मिळाले. तिथे जाऊन पारंपारिक नागा भोजनाचा आस्वाद घेऊन पुढच्या प्रवासासाठी तयार झालो. इतक्यात आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या बंद विषयी समजले. आजही कोणतेच वाहन उपलब्ध नव्हते. उखरूलला थांबून इथूनच परत जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक मित्रांनी अनेक प्रयत्न करूनही काही सोय होईना. आमची मोठीच गोची झाली. इथेच अडकणार असे वाटत असताना अचानक कुठून तरी एका गाडीची सोय झाली आणि अतिशय वाईट रस्त्यावरून अनेक तास प्रवास करून आम्ही पुढच्या मुक्कामी पोचलो तेव्हा अंगातील सर्व हाडे खिळखिळी झाली होती. या प्रवासात क्वचितच दिसणारी गावं, दूरवरच्या वस्त्या, तुरळक हा शब्दही फार भारी वाटावा इतकी कमी वाहतूक, चिखलमय रस्ते आणि त्यातून कसाबसा निघणारा रस्ता. मनात एकच प्रार्थना - ही गाडी बंद पडू नये!

खारासोमच्या छोट्याशा गावात मराठी माणसांनी चालवलेली एक शाळा आहे. स्व. भैय्याजी काणे या समर्पित कार्यकर्त्याने ७०-८०च्या दशकात घडविलेल्या शेकडो मणिपुरी विद्यार्थ्यांपैकी काहींनी त्यांच्या स्मरणार्थ या दुर्गम भागामध्ये शाळा सुरु केल्या आहेत. खारासोम ही त्यातलीच एक शाळा. आमच्या अगदी समोरचा डोंगर म्हणजे म्यानमार! इतक्या सीमावर्ती, दुर्लक्षित आणि उपेक्षित भागात ज्ञान दानाचे काम करणारी ही शाळा म्हणजे मानवाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे अफाट रूप आहे. या डोंगरांचा आणि मोबाईल रेंजचा तसाही काहीच संबंध नव्हता. इथे पोचण्यातच आम्हाला धन्यता वाटत होती. शाळेसमोर गाडी थांबली तेव्हा आम्ही येणार आहोत याबद्दल कोणताच निरोप त्यांच्याकडे नव्हता. तरीही अतिशय प्रेमळ चेहऱ्यांनी आमचे स्वागत झाले. पुढचे तीन दिवस आम्ही या गावातच काढले. रविवारच्या चर्चच्या उपासनेला गेलो. गावातील मुखियाच्या घरी राहिलो. सैन्याच्या छावणीत गेलो. गावकरी आणि सैन्याच्या संघांसोबत वॉलीबॉल खेळलो.
खारासोम गावातील झिमिक परिवार
इथली रात्र मात्र वेगळीच असे. अनेकदा वीज नाही. सगळीकडे काळोख. छतावर कोसळणारा पाऊस. विजांचा कडकडाट. मधूनच एखादी मोठी वीज चमके. त्या प्रकाशात जंगलाचे अस्तित्व जाणवे. बाकी भयाण शांतता. केवळ पावसाचा आवाज. क्षणिक अनामिक भीती आणि डोक्यात विचारांचे काहूर..भारतातील शेवटचे गाव आणि मी..आमच्यात संवाद सुरु होई..

आकाश, किती रे भाग्यवान तू? पुण्यातल्या सदाशिव पेठेत बालपण, शिकलेले आणि निर्व्यसनी आई-वडील, शिक्षणाबद्दल त्यांच्यातली जागरूकता, बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती, प्रबोधिनीसारखी शाळा, बाराही महिने सुंदर वातावरण, सामाजिक परिस्थिती अतिशय समतोल, विजेची आणि वाहतूकीची शाश्वती, मोठी बाजारपेठ, राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी आणि अजून बरंच काही! खारासोममधे तर यातलं काहीच नाही. परंतु तरीही खरंच आपण आनंदी आहोत का? समाधानी आहोत का? आपल्यापेक्षा कठीण परिस्थिती जगणाऱ्या अनेक बांधवांबद्दल आपल्याला जाणीव आहे का? त्यांचे आयुष्य सुकर व्हावे, नेटके व्हावे याबद्दल आपण काही करत आहोत का? पुढे काही करणार आहोत का? स्वप्नभूमी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेण्यातून नेमके काय साध्य करणार आहेस? भारतातील इतरांच्या भल्याचा विचार त्यातून होणार आहे का? आपल्या डोळ्यातील एखादे तरी स्वप्नं बघण्याइतपत खारासोमच्या मुलांना शिक्षण मिळेल का? स्वतंत्र नागा देशाची मागणी करणाऱ्या आपल्याच देशबांधवांना चांगले दिवस यावेत यासाठी काही प्रयत्न होतील का? की केवळ स्वतःच्या आशाआकांक्षांची समीकरणं जुळवत मी आणि माझ्यापुरता आपलं जगणं मर्यादून टाकणार आहेस? असे एक ना अनेक प्रश्न!

भारताच्या अगदी शेवटच्या गावातील हा मुक्काम म्हणजे जगण्याबद्दल आणि स्वतःबद्दल पुन्हा शून्यापासून विचार करायला लावणारा एक आरसाच होता. खऱ्या गरजा आणि सुखसोयींचा हिशोब पटावर मांडून आपण किती भाग्यवान आहोत याचेच पुन्हा पुन्हा दर्शन झाले. आपल्यावरील जबाबदारीची, त्यामागच्या कर्तव्याची जाणीव अधिक स्पष्ट झाली. परतीचा दिवस उजाडला. पाऊस पडतच होता. रात्रीच्या भासमान प्रश्नांची जागा आता ठरवलेली गाडी घ्यायला येईल कि नाही, रस्त्यात दरड पडून अडकून तर नाही राहणार ना अशा वास्तविक प्रश्नांनी घेतली होती. रात्रीचा संवाद आठवून स्वतःशीच हसलो आणि त्याच नयनरम्य भासणाऱ्या परन्तु वास्तविक पाहता भयानक असणाऱ्या डोंगरांमधून इंफाळकडे प्रवास सुरु झाला. ४ दिवसांनी घरी संपर्क झाला आणि एक कटू बातमी अंगावर कोसळली. (क्रमश:)   
          
बब्बू
३१.१२.२०१८
वेस्ट लाफियात, अमेरिका

भाग ३
भाग ४

Comments

Popular posts from this blog

Is it all about sex?

Shocked by the title? Or maybe excited? Maybe you are thinking that I have gone crazy to talk about 'this' thing. Maybe, you will be disappointed with what I am going to write. In any case, since you are already here, do read till the end. Read because this is a true story about someone's private life and not-so-private life. In October 2014, I met a person with a beautiful voice. She sang a melodious Kannada bhajan. I and my friends sat around her to listen to her story, a story that was unheard of, a story which was not even close to our realities. She narrated 'her' story..a story of a transgender! Akkai is her name today but she was born as Jagadish. ...I was born as a male child, a child with male private parts. Born into an upper caste family and father serving in the Air Force, it was herculean to come out to them. My brother had married a Christian girl and was excommunicated. Then sister married a Dalit boy and was excommunicated too. At the tender ag...

दुसरीच्या गणिताचं कोडं

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) संख्या वाचन आणि लेखनाची नवीन पद्धत आणली आहे. त्यावर सामाजिक माध्यमातून बरीच चर्चा झाली हे चांगलं झालं. या निमित्ताने शिक्षणासारखा महत्वाचा विषय चर्चेत आला. याबद्दल थोडक्यात... १. एकवीस , बावीस..च्या जोडीने वीस एक , वीस दोन ही पद्धत पुस्तकात आणली आहे. ही निश्चितच तुलनेने सोपी आहे याची कारणे शिक्षणशास्त्राच्या नजरेतून पुढीलप्रमाणे -   १.१ ' दशक आणि एकक पद्धतीमध्ये १० एकक एकत्र करून दशक होतो आणि त्यात पुढे एकक जोडत गेले की मोठ्या संख्या तयार होतात ' ही मांडणी प्राथमिक इयत्तांमधली पुस्तकांमध्ये मांडली जाते. यातील दशक-एकक क्रम महत्वाचा आहे. Concrete to abstract या pedagogical तत्त्वाला अनुसरून दहा एककांची मोळी तयार करणे अशा क्रियांना महत्व दिले गेले आहे. हा बदल 2005 च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणापासून जास्त स्पष्टपणे मांडला आहे. संख्या वाचनाचा नवीन बदल हा त्याच धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. म्हणून हा बदल गणित अध्यापनाच्या दृष्टीने शास्त्रीय ठरतो .  १.२ 'दशकाकडून एककाकडे'  हा  क्रम...

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...