बंगाल दौऱ्याहून परतल्यावर मी प्रबोधिनीतील कामाचा तांत्रिक राजीनामा दिला. गेल्या वर्षभरातल्या घडामोडी झरझर डोळ्यासमोरून जात होत्या. गणपती बाप्पाचं विसर्जन, त्यानंतर जेमतेम वीस दिवसांत केलेली GRE च्या परीक्षेची तयारी, धावपळ करत गाठलेल्या अर्जांच्या डेडलाईन्स, कोलंबिया विद्यापीठाचा थरार, पर्ड्यू की कोलंबिया हे ठरवण्यात झालेली मानसिक ओढाताण, अरुणाचल प्रदेशचा एक भावपूर्ण दौरा, दलासोबत केलेला मणिपूर-बंगालचा प्रवास, ब्रह्मपुत्रेचं प्रेमपत्र, आणि गंगेचा अवघड निरोप!
निरोप, किती अवघड गोष्ट! आपल्या हृद्य लोकांचा, इथल्या गुंफलेल्या नात्यांचा, या गंधभरल्या जमिनीचा, चविष्ट जेवणाचा एकाएकी निरोप.. पलीकडे काहीतरी मोठं खुणावत असताना हातातला रंगलेला डाव मोडून त्या अनागताच्या मागे जाण्यासाठी एकदा मागे वळून बघणं आणि पुन्हा तोच जुना डाव तसाच आधीसारखा रंगवायला मिळेल का नाही याची हूरहूर अनुभवणं हा मोठा अवघड प्रकार आहे. खुणावणाऱ्या पैलतीरासाठी ऐलतीर सोडण्याची भीती आणि पलीकडच्या गावी वाढून ठेवलेल्या अदृश्य शंकांचं एक भलंमोठं काहूर!
तेवीस जुलैला व्हिसाच्या मुलाखतीचे सोपस्कार पार पडले आणि मन घट्ट करून १४ ऑगस्टचं तिकीट काढलं. १५ ऑगस्टची प्रबोधिनीतली सकाळ फार सुंदर असते. शाळेच्या ध्वजवंदनाला माजी विद्यार्थ्यांची ही मोठी गर्दी असते कि गच्चीत उभं राहायला जागा मिळू नये. व्याख्यानाला बसू की मित्रांसोबत वाफाळलेला चहा घेऊ असं द्वंद्व कायमच तिथल्या प्रत्येकाच्या मनात असतं. "नको, तो मोहच नको," असं म्हणून मी आदल्या दिवशीचं तिकीट काढलं आणि एक बाका प्रसंग टाळला.
आता एक एक करून निरोपाचे कार्यक्रम सुरु झाले. कोणाकडे जेवणाचं निमंत्रण तर कुठे रात्रीच्या गप्पा. दुसऱ्या बाजूला वेळ होईल तसा कपड्यांची खरेदी. त्याच्या जोडीला स्वयंपाकाचा संसार घ्यायला तुळशीबागेत फेऱ्या. या सगळ्या गडबडीतही कायम लक्षात राहील असा एक छोटासा कार्यक्रम झाला. आदरणीय पोंक्षेसरांचा निरोप मिळाला, "शुक्रवारी आकाशला विभागात बोलवा." त्या कार्यक्रमात विभागातले सगळे जवळचे सहकारी जमले. सुरूवातीला सरांनी एक भावपूर्ण मनोगत व्यक्त केलं. माझ्या आजोबांपासून घरात चालत आलेल्या शैक्षणिक वारशाचा उल्लेख करून त्यांनी प्रबोधिनीतल्या आम्ही एकत्र केलेल्या कामाबद्दल सर्वांना सांगितलं. त्यांच्याकडून कौतुक ऐकायची सवय नसल्याने मी शांतपणे बसून होतो. उपस्थित सर्वांनी आपापली मनोगतं व्यक्त केली. सरांची तब्येत तेव्हाही नाजूक होती. ही भेट शेवटची नाही ना ठरणार अशी शंका मनात आलीच होती आणि पुढे घडलंही तसंच.
शेवटच्या आठवड्यात प्रबोधन वर्गावर मी विद्यार्थ्यांशी बोललो. सहावी सातवीची ती मुलं-मुली एका वर्षांत माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली होती. साडे तीन किलो वजनाची एक कल्पक भेट त्यांनी माझ्या हातात दिली. त्यात त्यांचे शुभेच्छासंदेश होते. आमचे विविध फोटो होते. शेवटी आम्ही एकत्र पद्य गायलो. मोठ्या मुश्किलीने अडवलेल्या आसवांना आम्ही सगळ्यांनीच मोकळी वाट करून दिली. वर्गाच्या सर्व ताई आणि मी असं एक विशेष नातं आमच्यात विणलं गेलं होतं. नवीन मराठी शाळेच्या कोपऱ्यावर आम्ही कपभर चहा घेतला. बऱ्याच वेळाने कसेबसे चेहरे हसरे करून एकमेकांचा निरोप घेतला.
निघण्याच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच घरी मित्र भेटायला यायला लागले. जुने विद्यार्थी आमच्यातल्या परंपरेला जागून भारताचा राष्ट्रध्वज घेऊन आले. परदेशी शिकायला जाणाऱ्या जवळच्या मित्रांना झेंडा भेट देण्याची प्रथा आम्ही २०११ ला सुरू केली होती. आज मला तीच भेट मिळत होती. दुसऱ्या एका गटाने भारताच्या क्रिकेट संघाची जर्सी भेट म्हणून आणली. नंतर आलेल्या गटाने स्वतःच्या हाताने रंगवलेला टीशर्ट भेट दिला. त्यावर आमच्या ओडिशा दौऱ्याची घोषणा म्हणजेच "झिगीझिगी झिगीझिगी जय जगन्नाथ" असं लिहिलं होतं. लोकांच्या गर्दीतून बाजूला काढत अंतराने हळूच आईबाबांसोबत दुपारच्या जेवणासाठी बाहेर जाण्याचा कार्यक्रम उरकून घेतला.
दिवस संध्याकाळकडे सरकला तसे जवळचे नातेवाईक भेटायला आले. काका, काकू, मामा, मामी, आजी, आत्या, वहिनी, बहिणी, मेव्हणे अशा सगळ्यांनी घर भरून गेले. ढोल ताशा परिवारातले मित्रही मधेच भेटून गेले. सत्यनारायणाच्या पूजेला एखाद्या घराबाहेर जोड्यांची गर्दी असावी तसं चित्र दिसत होतं. अजून सामान बांधून झालं नव्हतं. नुसताच गोंधळ! प्रबोधिनीतले काही सहकारी घरी होतेच. शेवटी कंटाळून आईने त्यांनाच सामान बांधायला बसवले. गौरव, कुणाल आनंदाने खाण्याच्या पदार्थांवर लेबलं लावत होते. एकीकडे अंतरा याद्या करत होती. बाबा पाहुण्यांकडे लक्ष देत होते. आणि मी आतल्या खोलीतून बाहेर, बाहेरून आत फेऱ्या मारत होतो. रात्री दोनच्या आसपास घर शांत झालं तेव्हा आई आणि अंतराने सामानाचा ताबा घेतला तेव्हा कुठे मला तयारी पूर्ण होण्याची चिन्हं दिसायला लागली.
सकाळीच चैतन्य भेटायला आला. केस कापेपर्यंत कुणाल आणि त्याची टोळी दुकानाबाहेर हजर! पावसात भिजत केतन आला. बालेवाडीचा ऋषिकेश थेट बाजीराव रस्त्यावर दाताच्या वैद्यांकडे भेटायला पोचला. प्रबोधिनीत एक धावती भेट देण्याचा मोह आवरला नाहीच. प्रथेप्रमाणे पहिल्या पायरीला नमस्कार करून आत गेलो. आ. गिरीशरावांनी चहा पाजला. सुभाषरावांनी जवळ घेऊन घट्ट मिठी मारल्यावर हुंदका आवरला नाही. गडबडीतच सर्वांचे निरोप घेऊन घरी परतलो. तितक्यात परेशही पोचला. अर्ध्या तासाच्या जेवणाच्या सुट्टीत गौरवलाही राहवलं नाही. तोही घरी येऊन गेला. अमित तर बहुतेक ऑफिसला सुट्टी टाकूनच आला होता.
निघायची वेळ झाली तसं दलावरच्या मुलांनी सर्व सामान खाली नेऊन ठेवलं. अंतराने राखी बांधली. आईने ओवाळलं. जणू काही घडतंच नाहीये असं उसनं अवसान इतके दिवस धरून ठेवलेल्या आईचा अखेर बांध फुटला. त्यादिवशी आम्ही चौघांनी भावनांना मोकळी वाट करून दिली. त्या नाजूक क्षणांनी जणू आमच्यातल्या अतूट नात्याची साक्षच आम्हाला दिली असं मला वाटलं. निघायची तयारी पूर्ण झाली होती. आम्ही खाली उतरलो तेव्हा प्रबोधिनीतले जवळचे मित्र एकत्र जमले होते. आम्ही गोल केला. कोणीतरी आज्ञा दिली. त्या भावपूर्ण क्षणांमध्ये प्रार्थनेचे स्वर अलगद मिसळले.. कि घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने... तेव्हा समजलं, हा निरोप नाही, संकल्प आहे..पुन्हा भेटण्याचा! (क्रमश:)
बब्बू
१६ नोव्हेंबर २०१९
वेस्ट लाफियात, अमेरिका
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ८
भाग १०

Comments
Post a Comment