आज एका पालकांशी त्यांच्या तरुण मुलाच्या मानसिक स्वास्थ्य विषयावर बोलण्याचा योग आला. गेली चार वर्षे कमी अधिक फरकाने मुलाचे मानसिक स्वास्थ्य अधून मधून बिघडताना जाणवत होते. एकटेपणा वाटणे, समोर उद्दिष्ट न दिसणे, कंटाळवाणे वाटणे, कशातही आनंदी न वाटणे, या विचारांनी डोकं बधिर होणे, उदास वाटणे, या सगळ्याबद्दल स्वतःला अपराधी मानणे अशा तक्रारी तो मला अधून मधून सांगत असे. या सगळ्यात पॅटर्न दिसायला लागल्यावर मी त्याला समुपदेशिकेकडेही जायला सांगितले. पण तेही त्याने नंतर बंद केले. गेल्या काही दिवसात त्रास वाढायला लागल्यावर मात्र त्याने घरी सांगितले पाहिजे याबद्दल मी आग्रह धरला. "घरचे काय म्हणतील", "ते काय मदत करू शकतील", "उलट मलाच दोष देतील" या विचारांनी तो घरी सांगायला तयार होईना.
"तुझे पालक आहेत ते; समजावून सांगितलं तर नक्की समजावून घेतील; त्यांना संधी तर दे," असं सांगून त्याला तयार केलं. पण बोलायचं कसं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. प्रत्यक्ष बोलणं जड जाणार असेल तर कोणाच्या तरी माध्यमातून बोल किंवा पत्र लिही असं सुचवलं. त्यानुसार त्याने एक whatsapp संदेश तयार केला. मी काही बदल सुचवले. पालकांपर्यन्त या प्रश्नाची वारंवारिता (frequency), कालावधी (duration), आणि तीव्रता (intensity) पोचेल असा प्रयत्न केला. त्यांना काही प्रश्न असतील तर मी माझ्या परीने उत्तरे देण्यासाठी उपलब्ध असेन अशी तयारी दाखवली. पत्र लिहून झाल्यावर मात्र त्याला दोनदा मागे फिरावंसं वाटलं; पण त्याने पुनः धीर गोळा केला आणि दसऱ्याच्या दिवशी घरी बोलला.
पालकांनी सुरूवातीला "दिनचर्या नीट कर", "व्यायाम करत जा" अशा गोष्टी सांगितल्या. पण त्यांच्यापर्यंत थोडाफार तरी मुद्दा पोचलाय हे मुलाच्या लक्षात आलं. मग आमची भेटायची वेळ ठरली, आणि त्यानुसार आज आम्ही भेटलो. सुरूवातीला मी चार वर्षातल्या घडलेल्या गोष्टींचा आढावा घेऊन प्रश्नाचं गांभीर्य पोचवलं. वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याबद्दल सुचवलं. अनेक घरांमध्ये आणि तरूणांमध्ये मानसिक समस्या निर्माण होतात हे सांगून मानसिक आजारांचे प्रमाण लक्षात आणून दिले. शेवटी घरामध्ये पालक कशाप्रकारे समजावून घेऊ शकतात; सल्ले देण्यापेक्षा ऐकून घेण्यावर भर देऊ शकतात हे सुचवले. शेवटी पालकांनी शंका विचारल्या.
आईचा पहिला प्रश्न होता, "मला का नाही सांगितलं?" साहजिक आहे, पण या प्रश्नाला फारसा अर्थ नाही हे समजावून द्यायला लागलं. बाबांच्या मते त्याची दिनचर्या ठीक नाही, मोबाईलचा वापर खूप आहे, किंवा मोबाईलच्या लहरींचा परिणाम असेल का असे प्रश्न होते. विज्ञानाच्या आणि (माझ्या तोकड्या) मानसशास्त्राच्या आधारे मी जपून उत्तरे दिली. योग्य सल्ला हे समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञच देऊ शकतील हे पुनः सांगितले. बैठकीच्या शेवटी वैद्यांकडे जायचे निश्चित झाले. एकूण संवाद शांतपणे आणि एकमेकांना समजावून घेणारा झाला. हे सारं बदलू शकतं आणि मुलगा पुनः तंदुरुस्त होऊ शकतो या ठिकाणी येऊन आमची भेट थांबली.
हे सगळं का लिहिलं? (1) आपण पालक असाल तर कदाचित आपल्या मुलांच्या आयुष्यातला ताण/प्रश्न आपल्याला दिसले नाहीत असे असू शकते. त्यांना सल्ले देण्यापेक्षा ऐकण्याकडे भर देऊन पाहूया का? म्हणजे त्यांनाही आपल्याकडे मन मोकळं करता येईल. (2) आपण पाल्य असाल तर आपल्या पालकांवर विश्वास ठेवून त्यांच्याशी आपले प्रश्न बोलून बघूया का? ते पालक आहेत, म्हणून ते जगात इतर कोणाहीपेक्षा आपली अधिक काळजी करतात. त्यांना कदाचित वेळ लागेल पण शेवटी विषय नक्की समजेल. त्यांना संधी देऊया. त्यांची मदत घेऊया. (3) आपण जर मित्र असाल, मार्गदर्शक असाल तर आपल्या मित्रांशी, विद्यार्थ्यांशी मानसिक स्वास्थ्य हा विषय बोलूया. त्यांना योग्य व्यक्तीची मदत घेण्यासाठी प्रोत्साहन देऊया. जनरल वरवरचे सल्ले देण्यापेक्षा आपण समुपदेशक किंवा वैद्य नाही हे लक्षात ठेवून योग्य व्यक्तीकडे पाठवूया, घेऊन जाऊया. आपल्या जनरल सल्ल्यामुळे इलाज होण्यापेक्षा अपाय होऊ शकतो हे ध्यानात घेऊया.
दर आठवड्याला एका तरी त्रस्त तरूणाशी बोलण्याचा संबंध येतो. रोज नवीन प्रश्न समोर येतात. आपल्या भोवती आपल्याला एकही मानसिक आजारातून जाणारी व्यक्ती दिसत नसेल तर याचा अर्थ सरळ आहे की आपण बारकाईने किंवा संवेदनेने आजूबाजूला बघत नाही आहोत. डोळस होऊया, मदत करूया, एकमेकांवर प्रेम करूया, आणि मुळात, समोरची व्यक्ती बोलत असताना ती काय बोलतीये आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ती काय नाही बोलते, हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. करूया ना? संवादात खूप ताकद आहे, ती वापरूया ना?
आकाश चौकसे
वेस्ट लाफियात
अमेरिका
27 ऑक्टोबर 2020
फारच उपयुक्त
ReplyDeleteधन्यवाद, अस्मिता. :)
DeleteIt is very necessary always sharing our thoughts with our kids mainly with our teenager child.
ReplyDeleteMuktsanvad asaylach pahijel.
Sadhya hi pidhi tyala mukat ahe.
Thank you. The times keep changing, making is important for parents to keep changing their parenting strategies. It's a challenge when parents do not have guidance.
DeleteThis story is amazing and wow factor
DeleteHeart touching story
Meaning full and awasom
Thank you! :)
DeleteThought provoking. #reality.
ReplyDeleteJust like corona cases.. just because we are not testing, doesn't mean it isn't there.
Thank you, Amruta. Very true. Perfect analogy.
DeleteKharach संवादात ताकद आहे. ...खूप छान मांडणी ...कदाचित यावर चिंतन करून दृष्टिकोन बदलू शकतो ...तसेही नवीन प्रश्न समजून घेताना नजर नाही नजरिया बदलण्याची गरज आहे.keep it up!!
Deleteधन्यवाद, मनाचे श्लोक!
Deleteनमस्कार आकाशदादा. सततच्या संवादातील ताकत आणि योग्य वेळी इतर पाठबळ घटकांची मदत घेण्याची सजगता या दोन्ही गोष्टी या लेखातून खूप चांगल्या पोहोचल्या आहेत. धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद, मेघना ताई!
Deleteलेख खूपच छान
ReplyDeleteखरोखरच संवादात खूप ताकद आहे
धन्यवाद! :)
Deleteबोलल्याने होत आहे रे । आधी बोललेची पाहिजे ।
ReplyDeleteधन्यवाद ताई. खरे आहे तुझे!
Deleteमहत्वाचे।
ReplyDeleteइथे नामी नावाची राष्ट्रीय पातळीवरील संस्था
आहे। जमल्यास स्थानिक बैठकीस जाऊन पहा।
तशा काही संस्था पुण्यात आहेत।
पण अधिक जनजागृती आवश्यक आहे।
नामीवरील लेख मी पाठवीन।
धन्यवाद ताई. :)
DeleteKhupach Chan Sankalpana mandali ahe ani asesch zar pratek palak aply mulanshi sanwad sadhu lagle tar aaj kal chya tarunache ardhya peksha zast problem gharich bolun sove hotil. i think hi atachya kalachi garaj ahe.. Great Article. Very Good.
ReplyDeleteधन्यवाद ताई. खरे आहे तुमचे.
DeleteDada, this was very helpful and thought-provoking. Definitely helped me!
ReplyDeleteThank you, Ananya. Glad you found it useful.
Deleteप्रयत्न नक्की करेन
ReplyDelete