Welcome, Sir!
हसऱ्या चेहऱ्यानं आमचं राणीपूर गावात स्वागत झालं. दुपारचे चार वाजले होते. आमच्या गाडीची वाट पहाट ६ स्थानिक तरुण-तरुणी रस्त्याच्या कडेला उभे होते. जंगल सफारी तर पुढच्या दिवशीपासून सुरू होणार होती. मग इथं नेमकं काय बघायला आलोय याची उत्सुकता लागली होती. "Walk with the Pardhis" अशा नावाचा कार्यक्रम इथे होणार होता इतकंच माहीत होतं.
पारधी समाज हा पारंपारिक दृष्ट्या शिकारीवर अवलंबून असलेला भटका समाज. इतर समाजाने काहीसा वाळीत टाकलेला, गुन्हेगार ठरवून टाकलेला समाज. गावात कोणताही गुन्हा घडला की पहिले पारधी वस्तीवर अटक होणार हे आपल्या समाजातलं करूण वास्तव. "ज्याच्या हाती ससा तो पारधी" अशी म्हणच जिथे रुळली आहे तिथे पारध्याच्या नशिबी "आधी अटक मग चौकशी" हाच न्याय येणार. त्यात नवल ते काय! 😢
आपण आता जंगल कसं बघायचं हे शिकणार आहोत,
बीरेन दादाने सांगितलं. आम्ही त्यांच्या पाठोपाठ चालायला सुरूवात केली. "हे आवळ्याचं झाड," "हे खैराचं झाड. पानात कथ्था लावतात ना ते हेच," असं सांगत सांगत त्यांनी आम्हाला एका खड्ड्यापाशी थांबवलं. "हे बघा, हे ओरखडे बघताय? हे अस्वलाने केलेत. वाळवी खाण्यासाठी अस्वलं जमिनीत असे खड्डे करतात." आम्ही थबकून सगळं ऐकत होतो.
हा ठसा बघा. तरस या बाजूने तिकडे गेलं आहे.
"हा छोटा ठसा रानडुकराचा आहे. हा वाघालाही टशन देतो." "ही विष्ठा बघताय? ही नीलगायीची आहे. नीलगायी एका ठराविक ठिकाणी कायम विष्ठा करतात. मग वाळवी त्याचं मातीत रूपांतर करते." आम्ही कुतूहलाने सगळं समजावून घेत होतो. पुढे आम्ही असेच लंगूर, मुंगूस, उदमांजर (Civet) यांचे ठसे बघितले. ठसे बघून ते कोणत्या प्राण्याचे आहेत हे ओळखण्यात आता आम्हाला मजा येऊ लागली होती.
| पाऊलखुणा वाचायला शिकताना |
हे ठसे बघताय? हा बिबट्याचा ताजा ठसा. आज पहाटेच बिबट्या इथून गेलाय.
१२ सेंटीमीटरचा तो पंजा बघून आम्ही मोठा आवंढा गिळला. काही तासांपूर्वी याच वाटेवरून बिबट्या गेलाय ही कल्पना शहारा आणणारी होती, तेही वस्तीपासून अवघ्या काही मीटरवरून!
| बिबट्याचा ठसा |
सूर्य मावळतीस जात होता. आता आमची पायवाट एका कड्याशी येऊन संपली. समोरच्या काळ्या कातळावर पोचलो आणि भानच हरपले! १००-२०० फुटांच्या sandstone च्या उत्तुंग घळीवर आम्ही उभे होतो. नजर जाईल तिथवर डोंगर रांगा आणि घनदाट जंगल. समोरच्या कड्यावर दिसत होत्या असंख्य कपारी आणि कड्याच्या तळाशी नीळाशार पाणवठा! नि:शब्द शांततेला अपवाद फक्त कड्यावरच्या वाऱ्याचा. शब्दांच्या पलीकडचं असं काहीतरी आम्ही अनुभवत होतो!
| The Gorgeous Gorge of Ranipur! |
बीरेन दादांनी आम्हाला विविध पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज काढून दाखवले. बिबट्याचा आवाज तर इतका हुबेहूब काढला की शेजारीच उभं असलेलं कुत्रं घाबरून भुंकायला लागलं.
अंधार व्हायला लागला तशी उत्सुकतेची जागा आता अनिश्चिततेने आणि भयाने घ्यायला सुरूवात केली. आम्ही परतीची पायपीट सुरू केली. बांधावर एका आज्जींनी पकोडा तळला. दगडावर आवळे ठेचून त्याची अप्रतिम चटणी केली. पळसाच्या पानांच्या द्रोणातली ती भजी-चटणी खाताना आमच्यात संवाद रंगला.
| पळसाच्या द्रोणात पकोडा आणि आवळ्याची चटणी |
आम्ही आधी शिकार करायचो. आता आम्ही शिकार सोडली आहे.
पारधी बांधवांनी त्यांच्या नवीन जीवनशैलीबद्दल सांगायला सुरूवात केली. "आम्ही जंगलाच्या जवळ रहात होतो. काही वस्तू खरेदी करायला बाजारात यायचं म्हणजे अधिकाऱ्यांची नजर चुकवायला लागायची. मग त्यासाठी इतरांसारखे कपडे घालायचो. प्राण्यांच्या आवाजात एकमेकांशी बोलायचो. हळूच परत जंगलात यायचो. अंग चोरून राहायचो. आता आम्ही भटकत नाही. एका ठिकाणी वस्ती करतो. मुलांना शाळेत घालतो. आम्ही शिकार सोडली आहे. आता जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न करतो."
| स्थानिक सेंद्रिय मध खरेदी करताना |
खरंय! अवघ्या १२ वर्षांपूर्वी पन्नातले वाघ नष्ट झाले होते. काही शिकारीने गेले तर काही नर माद्या संपल्याने निघून गेले. मग वन खात्याने अथक प्रयत्न करून नवीन वाघ आणले. ते टिकण्यासाठी इतर जैवव्यवस्था वाढवली. स्थानिक बांधवांची मदत घेतली. त्यात पारधी समाजाचे मोठे योगदान आहे. परिणामतः, पन्नात आता साठ-सत्तर वाघ, दोनशेच्या आसपास बिबट्या, आणि प्राणी-पक्षांच्या शेकडो प्रजाती आहेत.
वाघ-बिबट्या अन्न साखळीच्या सर्वात वर आहेत. ते टिकले तर जंगल टिकेल, माणूस टिकेल, हा विचार मनात घेऊन आम्ही राणीपूर सोडले. उद्या जंगलात जाण्यापूर्वी आम्ही आज जंगल कसे वाचायचे हे शिकण्यास सुरूवात केली. आता ओढ लागली ती वाघाच्या प्रत्यक्ष भेटीची! (क्रमश:)
बब्बू
३० डिसेंबर २०२१
छायाचित्रं - अंतरा चौकसे, वरद बनसोड
Comments
Post a Comment