प्रिय ज्ञा पु,
सप्रेम नमस्कार!
आज तुम्हाला हे पत्र लिहिताना मनात खूप अस्वस्थता आहे. वेळ जणू काही मंदावला आहे. आज दिवसभर सतत मनात तुमच्या आठवणींनी काहूर माजलं होतं. आजवर तुमच्याशी बोलताना कधीच संकोच वाटला नाही, पण आज हे पत्र लिहिताना मात्र शब्द अडकतायेत.
मागच्या महिन्यात आपण तुमच्या वाढदिवसाला बोललो. किती उत्स्फूर्तपणे तुम्ही "धन्यवाद बंधू आकाश" अशी साद घातली होतीत. कसं जमायचं तुम्हाला असं कोणालाही आपलंसं करून टाकायला? मेच्या शेवटच्या आठवड्यात तर आपण शिबिराला भेटलो. एका मेसेजवर तुम्ही शिबिरात विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला तयार झालात. स्व-रूपवर्धिनी सारख्या मोठ्या संस्थेचे कार्यवाह असूनही तुम्ही एका मेसेजवर "हो" म्हणलात. तुम्हाला एका साध्या फोनचीही अपेक्षा नाही वाटली? कुठून येतो हा साधेपणा? कसं जमतं अशा सर्व जगाला व्यापून उरलेल्या अहंचा त्याग करणं?
तुमचा प्रतिसादही मला लाजवणारा होता. तुम्ही उत्तरात लिहिलंत, "अरे जरूर आकाश. आप सिर्फ आज्ञा करो. बंदा हाजीर. 😄" अहो ज्ञा पु, कोण असं इतकं स्वतःवर हक्क गाजवून घेतं? मी तुमच्याहून २० वर्षांनी लहान. तुमच्या कार्य कर्तृत्वासमोर तर मी त्याहूनही खुजा. गोरगरिबांच्या पोरांना शिकवण्यासाठी तुम्ही केलेल्या त्यागाची तर सरच नाही. असं तुमचं उंच, समृद्ध, विशुद्ध व्यक्तित्व असूनही तुम्ही मला म्हणता "आप सिर्फ आज्ञा करो. बंदा हाजीर." कोणत्या मातीचे बनला होतात तुम्ही?
![]() |
| आ. ज्ञानेशजी पुरंदरे |
तुम्हाला आठवत असेल तो ३ जून २००९ चा दिवस! अरुणाचल प्रदेशातल्या तवांगच्या युद्धभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तो दिवस. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तुमच्यासोबत मला महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाली. ८००० फूट उंचावर असलेल्या त्या थंड सूर्यभूमीवर जीव तोडून पोवाडे सादर केले आपण. नुकतीच दहावी झालेली कोवळी निवेदिता होती आपल्यासोबत. बारावीची सुट्टी एंजॉय करत असणारा अखिलेश, म्हणजे तुमचा "गोट्या" होता आपल्यासोबत. काय धमाल केली आपण त्या पंधरा दिवसात! पुणे ते गुवाहाटी असा भला मोठा चार दिवसांचा प्रवास होता. पण तुमच्या सोबत पद्य, अभंग, पोवाडे म्हणत कसा निघून गेला कळलंच नव्हतं. तुम्हाला आठवतं, आपण सगळा डबा गोळा करायचो आपल्या भोवती? मग शेरोवाली माता, भारत के जवानो, आणि महाराजांचे पोवाडे गात गात तो सगळा प्रवास भक्तिमय, वीरश्रीमय होऊन जायचा.
आपण तवांगचा कार्यक्रम झाल्यावर बूमला पोस्टवर चीनच्या सीमेवर गेलो होतो. प्रचंड हिमालयाच्या अतिशय अवघड रस्त्याने प्रवास करून जेव्हा आपण सीमेवर पोचलो तेव्हा किती जोशपूर्ण घोषणा दिल्या होत्या तुम्ही. तेव्हा म्हणलेलं राष्ट्रगीत आठवून अजूनही शहारे येतात अंगावर. परतीच्या प्रवासात तेंगा व्हॅलीमध्ये मराठी सैनिकांनी आपल्याला हट्टाने थांबवून घेतलं. आपण खोलीत पोचल्या पोचल्या कर्नल पाथरकर साहेबांचा "कोणती दारू घेणार" असं विचारायला फोन आला होता. त्या फोन नंतर आपण किती हसलो होतो! त्या कार्यक्रमात तुमच्या आणि शाहीर कामथेंच्या पोवाड्यांनी त्या हिमालयाच्या युद्धभूमीवर दक्ष असणाऱ्या मराठी सैनिकांना काय वेड लावलं होतं. सगळे सैनिक बेभान होऊन नाचले होते. अवघ्या १९ वर्षांचा मी त्या स्टेजवरून ते सगळं दृश्य बेभान होऊन बघत होतो. मनात साठवून घेत होतो.
![]() |
| अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील बूमला पोस्ट (जून २००९) |
गेल्या अकरा वर्षांमध्ये कितीतरी वेळा आपण शिबिरांमध्ये भेटलो. तुम्ही बोलावं आणि आम्ही ऐकत राहावं असं वाटे. वर्धिनी-प्रबोधिनीच्या कार्यक्रमांना भेटलो की तुम्ही कडकडून मिठी मारायचात. त्या मिठीतून तुमची अमाप माया खूप काही देऊन जायची. तीनेक वर्षांपूर्वी वर्धिनीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात तुम्ही मला हक्काने डोणज्याला बोलवून घेतलं. वस्ती विभागाच्या अभ्यासक्रमाच्या बद्दल सर्व वरिष्ठ वर्धक विचारमंथन करत होतात, तेव्हा तुम्ही म्हणलात, "आकाश, तुझं मार्गदर्शन पाहिजे आम्हाला." मला भयानक ओशाळल्यासारखं झालं होतं पण तुमच्या प्रेमाचा शब्द कसा खाली पडून देणार. त्या दोन दिवसांत मी वर्धिनीचा होऊन गेलो. ते नातं आजही तसंच आहे. केवळ तुमच्यामुळे.
निलेशचा गडावर अपघात झाल्याचं कळलं तेव्हा मी अमेरिकेत होतो. तुमची पोस्ट वाचली, आणि तुम्हाला फोन केला. तुम्ही तासभर गप्पा मारल्या. सांत्वन केलंत. धीर दिलात. ज्ञा पु, आज कोण सांत्वन करेल? आज कोण धीर देईल? तुमच्यावर खूप चिडलोय मी. भयंकर नाराज आहे. हे असं कोण वागतं? की तुम्ही सगळ्याच गोष्टी जगावेगळ्या करायच्या असं ठरवलंच होतं?
माझ्या सारख्या अनेकांना एकटं मागे सोडून तुम्ही भले विवेकरावांना भेटायला गेलात. त्या अरुणाचलच्या दौऱ्यात ऐनवेळी त्यांच्या जागी तुम्ही गटात सामील झाला होतात. आज तुम्ही त्यांनाच सामील झालात? नॉट फेअर, ज्ञा पु, नॉट फेअर. तुम्ही साइड बदललीत. गोट्या आणि बंधू आकाशशी साइड सोडून निवेदिताच्या गटात गेलात? दौऱ्यातही तुम्ही तेच करायचात. "बागेश्रीची लेक" म्हणून निऊच तुमची लाडकी होती. तिला त्रास देऊ नका असं म्हणून आम्हालाच दम द्यायचात. आधी विवेकराव, मग निऊ, आणि आता तुम्ही.. आम्हाला एकेक करून सोडून गेलात. ज्ञा पु, ही चिटिंग आहे. ज्ञा पु, ही चिटिंग आहे.
खोलीतल्या तिरंग्याशी आज तीन दिव्यांची कुजबूज आहे. ज्ञा पु, ही चिटिंग आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
तुमचाच,
बंधू आकाश
२३ जुलै २०२०
वेस्ट लाफियात, अमेरिका




ज्ञापूंच अस अचानक निघून जाणं ,मनाला चटका लावणार आहे.
ReplyDeleteखूप घाई केली त्यांनी! मी खूप नाराज आहे नीयतीवर.....
ReplyDeleteतुझ्या लेखामुळे अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. विनयशील व अदबशीर तरीही आपलेसे करणारे बोलणे कानात घुमतेय ................................ खूपच उदास वाटते आहे.
ReplyDeleteBeautiful and touching.
ReplyDeleteअश्रू आवारत नाहीत ज्ञा पु ....
ReplyDeleteआकाश मित्रा काळजाला हात घातलास..
ReplyDeleteआपला सर्वांचा एक विचार ग्रंथ हरवला..
खरच ज्ञा. पु. नी चीटिंग केली..
🙏🙏😔😔
ReplyDeleteफारच सुंदर... या सगळ्यांना भयानक रोग घेऊन गेलेत याचे जास्त वाईट वाटते... कॅन्सर, देणगी8 आणि आता हा कोरोना....😢😢
ReplyDeleteआकाश , खुप छान लिहिले आहे . शब्द रचना खूपच नेटकी. श्रध्हान्जलीत्मक तुझ्या या लेखामुले तु नववित असताना चे प्रेमाचे व आफुलकिचे हित संम्बध निर्माण केले होतेस हे समजले.तेही खुप मोठ्या मनाच्या व्यक्ति सोबत अभिमान वाटतो तूझा नाना असण्याचा. म्हणुनच तर मला तु खुप आवडतोस.
ReplyDelete