Skip to main content

बाकरवडी ते बरीटो - भाग ४: दिल तो बच्चा है जी

आपल्याला कोलंबिया विद्यापीठाच्या टीचर्स कॉलेजमध्ये खरंच प्रवेश मिळाळा आहे याची पूर्ण खात्री झाल्यावर आणि त्याने बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारीला मी माझ्या PhD चे मार्गदर्शक प्रा. बोर्लंड यांना पत्र लिहिलं. प्रज्ञावंतांच्या शिक्षणातील ते एक अतिशय विद्वान आणि जगप्रसिद्ध प्राध्यापक आहेत. गेल्या काही महिन्यांत आमच्यात जो पत्रव्यवहार झाला होता त्यातील त्यांच्या सूचनेवरूनच मी इकडे अर्ज पाठवण्याचं धाडस केलं होतं. "आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. आता शिष्यवृत्तीच्या पत्राची प्रतीक्षा आहे.", मी त्यांना कळवले. PhD च्या शिक्षणासाठी अमेरिकी विद्यापीठांमध्ये संपूर्ण शिष्यवृत्ती मिळतेच या विश्वासाने मी पुढच्या नियोजनाला लागलो. आठवडाभरात विद्यापीठाचा निर्णय येईल याची खात्री होती म्हणून १५ मार्च उजाडला तरी अजून काहीच निर्णय न आल्याने मी थोडा अस्वस्थ व्हायला लागलो होतो.

पुढच्या नियोजनाच्या अंतर्गत विनयने, खूप वर्षं बारगळलेल्या आमच्या एका रोडट्रीपची आठवण करून दिली आणि आम्ही, म्हणजे मी, बंड्या आणि विनयने 'आता कमी दिवस उरलेत बाबा' या अविर्भावात १८ मार्च तारीख ठरवून टाकली. ताम्हिणीच्या आमच्या घरी रात्री उशिरा पोचल्यानंतर पहाटेपर्यंत आम्ही गप्पा मारल्या आणि उपासनेची वेळ कधी झाली हे कळलंच नाही. मोकळ्या हवेवर उपासना करून पुन्हा पुढचे २ तास तिथेच फतकल मांडून गप्पा हाणल्या. 'थोडावेळ झोपून बाहेर पडू' असं ठरवूनही कोणाला झोप येईना. तसेच निघालो आणि रायगडाच्या पायथ्याशी गेलो. दुपारभर दंगा करून संध्याकाळी पुन्हा ताम्हिणीला परतलो. जलतरण तलावात, सांजवेळी, कॅरावानवर कुठलीतरी बळंच जुनी गाणी लावून आम्ही तिघेच डुंबत होतो. झोपण्यात एकही क्षण वाया न घालवता दुनियादारीचा बराचसा 'पेंडिंग' कोटा आम्ही त्या ट्रीपमध्ये भरून काढला.

या ट्रीपच्या नादात त्याच दिवशी सकाळी कोलंबिया विद्यापीठाच्या आलेल्या उत्तराकडे मी जरा दुर्लक्ष केले. वीसेक हजाराची अर्धवट शिष्यवृत्ती त्यांनी मला देऊ केली होती. भारतीय चलनाप्रमाणे त्याची किंमत १४ लाखाच्या आसपास जरी जात असली तर पर्ड्यू विद्यापीठाच्या तुलनेत ही रक्कम निम्मीच होती. त्यात न्यूयॉर्क शहरात रहाण्याचा खर्च भरून निघेल का हा प्रश्न होताच. मग शोध सुरु झाला माहितीचा. न्यूयॉर्कमध्ये घराचे भाडे, खाण्याचा खर्च यांची गणितं समजावून घेण्यासाठी तिथल्या एका भावाला आणि काही मित्रांना फोनाफोनी सुरु झाली पण अजूनही डॉलरचा हिशोब काही केल्या माझ्या डोस्क्यात शिरेना.

एका बाजूला फेलोशिपसकट पूर्ण चार वर्षांची नि:शुल्क व्यवस्था करणारे पर्ड्यू विद्यापीठ तर दुसऱ्या बाजूला अर्धवट शिष्यवृत्ती देणारे स्वप्नातील कोलंबिया विद्यापीठ. वेस्ट लाफियातच्या छोट्या शहरातील निवांत जीवनशैली एका बाजूला तर दुसरीकडे टोलेजंग न्यूयॉर्कमधील धकाधकीचे आयुष्य. PhD च्या प्रचंड व्यापात हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो असे ऐकले होते. पर्ड्यूमध्ये माझ्या विषयात काम करणाऱ्या संशोधकांची मोठी फौज होती तर कोलंबियामधे प्रा. बोर्लंड यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी. एका बाजूला पर्ड्यूचे जागतिक दर्जाचे प्रज्ञा विकास कार्यक्रम आणि त्यासोबत मिळणारी मुलांसोबत काम करण्याची अप्रतिम संधी तर दुसऱ्या बाजूला कोलंबिया विद्यापीठाचे अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन! कुरुक्षेत्रावरील पार्थासारखी माझी दुविधापूर्ण अवस्था झाली होती. निर्णयच घेता येत नाहीये या अवस्थेचा याआधी माझ्याकडे फारसा अनुभवच नव्हता. 
Source: www.australianfrequentflyer.com.au/
त्याच दरम्यान पर्ड्यू विद्यापीठातील माझ्या PhD च्या मार्गदर्शकांना मी मोकळेपणाने पत्र पाठवले. त्यात माझ्या मनातील द्वंद्व मी स्पष्टपणे लिहून पत्राच्या शेवटी 'तुम्ही माझ्या जागी असतात तर काय निर्णय घेतला असता?' असं विचारून मोकळा झालो. त्यांचेही लगेच उत्तर आले. पर्ड्यूच्या एकूण PhD program चे सविस्तर विश्लेषण करणारे पत्र त्यांनी लिहिले होते. फेलोशिपचे फायदे, उन्हाळ्यातील शिष्यवृत्ती, परिषदांसाठी दिला जाणारा प्रवास खर्च, शिक्षण-संशोधन-अध्यापन अशा सर्वांगीण संधी असे अनेक बारकावे त्यात लिहिले होते. खरंतर, कोलंबियाच्या प्रेमात मी पर्ड्यूकडे अत्यंत दुर्लक्ष केल्याचे मला तेव्हा जाणवले. माझ्या विषयातील इतक्या वरच्या दर्जाचे काम या ठिकाणी चालते याचा मला गंधच नव्हता. किती ते अज्ञान! म्हणजे, प्रज्ञावंतांचे शिक्षण या विषयातील अमेरिकेतील सर्वोत्तम आणि सर्वांगीण शिक्षण पर्ड्यूमध्ये मिळते आणि तिथे प्रवेश मिळाल्याचा आनंद साजरा करायचा सोडून कोलंबियाच्या विरहाच्या कल्पनेत तीळपापड होणाऱ्या माझीच मला कीव आली.

मेंदूला पर्ड्यूची निवड पटली होती तरीही माझे मन अजूनही कोलंबियात अडकले होते. एव्हाना एप्रिलच्या अरुणाचल दौऱ्याची तारीख जवळ आली आणि मी 'परत आल्यावर बघू' असे म्हणून अरुणाचलला निघून गेलो. आजचे मरण उद्यावर ढकलले असले तरी दहा दिवसांनी निर्णय घ्यायचाच होता. दरम्यान, शिष्यवृत्ती वाढवून देण्यासाठी प्रा. बोर्लंड यांनी माझ्या वतीने कोलंबिया विद्यापीठात शिफारस केली. त्याचा निर्णय वेळेत आला नाही म्हणून विद्यापीठाने अंतिम मुदतही वाढवून दिली. जे सगळं घडतंय याचं श्रद्धापूर्वक निवेदन मी माझी मैत्रीण अपूर्वा हिला करत होतो. तिच्याचमुळे मी PhD चा घाट घातला, असं म्हणायलाही हरकत नाही इतकी मोठी भूमिका या सगळ्यात तिची होती. तिची कामाची पद्धत एकदम रोखटोक. मी तिला मिशिगनला फोन लावला आणि परिस्थिती समजावून सांगितली. तिच्याही मते पर्ड्यूच योग्य निर्णय होता. यावर, "But, Columbia is Columbia!", असं मी तिला म्हणल्याक्षणीच पलीकडून तिचा दरडावून प्रश्न आला, "कोलंबियाला काय सोनं लागलंय का?"

तिचे ते शब्द गरम तेलासारखे माझ्या कानात शिरले. मेंदूला झिणझिण्या आल्यासारखं झालं आणि सर्व विचारांचा बांध क्षणार्धात फुटला. इतकं सर्व स्पष्ट दिसत असतानाही आपल्याला तार्किक निर्णय घेता येऊ नये याची एक क्षण लाज वाटली. फोन ठेवल्यावर काही वेळ मी पुन्हा विचार केला आणि 'का पर्ड्यू?' नावाचा एक छोटा निबंधच लिहून काढला. वैचारिक-भावनिक गुंता सुटल्यासारखे वाटल्यावर दुसऱ्या दिवशी मी पर्ड्यूला पत्र लिहिले.. I happily accept your offer of admission..

पण २ आठवडे झाले तरीही मनात कुठेतरी स्वप्नभंगाची झोंब होतीच. मी प्रा. बोर्लंड यांना एक पत्र लिहिलं, "I regret to inform you about my decision...I hope you won't mind meeting me coffee in my visit to NY someday! Thank you for everything." त्यांचंही तितकंच हृद्य उत्तर आलं, "Sorry to hear this. It's a loss for the college. I'd be happy to have coffee when you are in New York." दोन महिन्यांनी आज सगळं एकदम शांत झाल्यासारखं वाटत होतं. घरातल्या टिपॉय वर पाय पसरून मी रेडीओ लावला. मागे वळून बघताना गालावर स्वतःच्या वेडेपणाबद्दल अलगद हास्य उमटलं. मंद आवाजात तेव्हा रेडिओवर गाणं वाजत होतं..दिल तो बच्चा है जी! (क्रमश:)     

बब्बू
८.१०.२०१८
वेस्ट लाफियात, अमेरिका

भाग १
भाग २
भाग ३
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ८
भाग ९
भाग १०

Comments

  1. पर..सच्चा है जी!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद unknown!

      Delete
    2. स्वतः जगलो हे सगळं असं वाटलं मला!! मस्त सर!!❤️

      Delete
    3. धन्यवाद ऋष्या !

      Delete
  2. Khupach kammal anubhav..

    Waiting for next one.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.. लिहिलाय पुढचा भाग

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Is it all about sex?

Shocked by the title? Or maybe excited? Maybe you are thinking that I have gone crazy to talk about 'this' thing. Maybe, you will be disappointed with what I am going to write. In any case, since you are already here, do read till the end. Read because this is a true story about someone's private life and not-so-private life. In October 2014, I met a person with a beautiful voice. She sang a melodious Kannada bhajan. I and my friends sat around her to listen to her story, a story that was unheard of, a story which was not even close to our realities. She narrated 'her' story..a story of a transgender! Akkai is her name today but she was born as Jagadish. ...I was born as a male child, a child with male private parts. Born into an upper caste family and father serving in the Air Force, it was herculean to come out to them. My brother had married a Christian girl and was excommunicated. Then sister married a Dalit boy and was excommunicated too. At the tender ag...

दुसरीच्या गणिताचं कोडं

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) संख्या वाचन आणि लेखनाची नवीन पद्धत आणली आहे. त्यावर सामाजिक माध्यमातून बरीच चर्चा झाली हे चांगलं झालं. या निमित्ताने शिक्षणासारखा महत्वाचा विषय चर्चेत आला. याबद्दल थोडक्यात... १. एकवीस , बावीस..च्या जोडीने वीस एक , वीस दोन ही पद्धत पुस्तकात आणली आहे. ही निश्चितच तुलनेने सोपी आहे याची कारणे शिक्षणशास्त्राच्या नजरेतून पुढीलप्रमाणे -   १.१ ' दशक आणि एकक पद्धतीमध्ये १० एकक एकत्र करून दशक होतो आणि त्यात पुढे एकक जोडत गेले की मोठ्या संख्या तयार होतात ' ही मांडणी प्राथमिक इयत्तांमधली पुस्तकांमध्ये मांडली जाते. यातील दशक-एकक क्रम महत्वाचा आहे. Concrete to abstract या pedagogical तत्त्वाला अनुसरून दहा एककांची मोळी तयार करणे अशा क्रियांना महत्व दिले गेले आहे. हा बदल 2005 च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणापासून जास्त स्पष्टपणे मांडला आहे. संख्या वाचनाचा नवीन बदल हा त्याच धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. म्हणून हा बदल गणित अध्यापनाच्या दृष्टीने शास्त्रीय ठरतो .  १.२ 'दशकाकडून एककाकडे'  हा  क्रम...

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...