नोव्हेंबर महिन्यातली अर्जांची धावपळ एक डिसेंबरच्या रात्री थंडावली. Harvard, Berkeley, Stanford, Michigan, Wisconsin, आणि Vanderbilt अशा शिक्षण विषयातल्या सहा जगप्रसिद्ध आणि पहिल्या २० च्या यादीतल्या विद्यापीठांचे अर्ज भरून पाठवताना भरपूर दमछाक झाली. शेवटचे २-३ दिवस कामावरून सुट्टी घ्यावी लागलीच. अजून तीन ठिकाणचे अर्ज बाकी होते. त्यांच्या अंतिम तारखा १५ डिसेम्बर, ३० डिसेंबर आणि २ जानेवारी असल्याने मी पुन्हा निवांत झालो. शेवटच्या दिवशीपेक्षा अलीकडेच काम संपवले तर आपल्याकडून फाउल होईल आणि धारिणीला धूळ खात पडलेली अभियांत्रिकीची पदवी झोपेत येऊन आपल्याला शाप देईल या भीतीने ते तीनही अर्ज मी शेवटच्याच दिवशी भरले. उगीच रिस्क कशाला?!
मी एकूण ९ अर्ज पाठवले. (म्हणजे लाखभर रुपयांचा चुराडा... जास्तच...असो) पैकी ७ ठिकाणी गणित शिक्षण या विषयात तर बाकी दोन ठिकाणी प्रज्ञावंतांचे शिक्षण या विषयात अर्ज केले. अजूनही PhD साठी शिकायला परदेशात जाण्याची मानसिक तयारी झालेलीच नव्हती. पुण्यात माझं निवांत चालू होतं. घरी राहायचं, हातात जेवणाचे आयते ५-६ डबे, कार्यालय मोजून ७ मिनिटांच्या अंतरावर, सगळे सहकारी वर्षानुवर्षांचे मित्र, स्नेही, मार्गदर्शक, पगारही उत्तम, कामंही अत्यंत आवडीचं, म्हणजे एकूण काय तर अतिशय 'सेटल्ड' आयुष्य जगता जगता कुठून मला PhD, आणि तेही परदेशात करायची अवदसा सुचली हा प्रश्न वारंवार मनात येई. तर, अर्ज करू आणि पुढचे पुढे पाहू हा माझे लाडके मुख्याध्यापक मा. विवेकराव पोंक्षे यांनी दिलेला सल्ला मी तंतोतंत पाळला. कर्मफळाची अपेक्षा न ठेवता कर्म करायला सांगणाऱ्या योगेश्वर श्रीकृष्णाची मला तेव्हा आठवण झाली.
९ अर्जांपैकी मला कोलंबिया विद्यापीठात जायची सगळ्यात प्रबळ इच्छा होती. याला एक मोठे कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच विद्यापीठात शिकले होते. बाबासाहेब हे भारतातील २० व्या शतकातील सर्वाधिक प्रज्ञावंत व्यक्ती आहेत असे माझे ठाम मत आहे. त्यांचा पुतळा बसवलेल्या त्या विश्वविख्यात विद्यापीठात प्रवेश मिळवायचा इतकेच स्वप्न मला पडायचे. कोलंबिया विद्यापीठ हे जगाची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्क शहराच्या सदाशिव पेठेत (किंवा दादरमध्ये!) म्हणजे Manhattan मध्ये आहे. शिक्षण क्षेत्रातील गुरु जॉन डुई हे तिथल्या टीचर कॉलेजला शिकवत असत. बाबासाहेबही त्यांच्या तासांना जाऊन बसत. हे टीचर कॉलेज जगातील सर्वात पहिले आणि अजूनही सर्वात मोठे शिक्षकी महाविद्यालय आहे. एकावेळी ५००० विद्यार्थ्यांना घडविणारे कोलंबिया टीचर कॉलेज माझे स्वप्नातले महाविद्यालय होते. त्या विचारानेदेखील मी एका क्षणात विचलित व्हायचो. काही वर्षांपूर्वी तर त्याची वेबसाईट उघडायला सुद्धा घाबरणारा मी तिथे प्रवेश वगैरे घेण्याच्या स्वप्निल आशेत होतो.
Source: www.leadershipconnect.io
जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात Purdue विद्यापीठाचे उत्तर आले आणि धस्स झाले. उत्तर सकारात्मक होते. पुढचं पुढे बघू (म्हणजे कोलंबियाचे उत्तर येईपर्यंत!) म्हणता म्हणता पहिले उत्तर आले. पुढच्याच आठवड्यात तिथल्या प्राध्यापकांचं पत्र आलं. डीन फेलोशिपसाठी त्यांनी माझे नाव अंतिम केल्याचे कळवले. मी विचार केलेल्यापेक्षा फारच वेगात चक्र फिरायला लागल्यावर मी अस्वस्थ झालो. बाकीच्यांची उत्तरं येण्याची वाट बघू असं मनाला सांगून वेळ मारून नेली. पुढच्या एक दोन आठवड्यात ४ विद्यापीठांकडून नकार आले. पैकी Harvard आणि Stanford चे नकार सलगच्या दिवशी आले. फारशा अपेक्षा ठेवल्या नव्हत्या तरीही वाईट वाटत होतंच. जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांना अर्ज केला नाही ही खंत घेऊन आयुष्यभर जगण्यापेक्षा नकार घेतलेला मला चालणार होता. हे चारही अर्ज गणित अध्यापनातले होते आणि गेले तीन वर्षं मी प्रज्ञावंत शिक्षणात काम करत होतो. अर्ज करताना केलेली मोठी चूक माझ्या लक्षात आली. ज्या विषयात सर्वाधिक काम केलं आहे त्याच विषयातले अर्ज करायला हवे. तुमची प्रोफाईल तुम्हाला समजली पाहिजे. माझा गृहपाठ मी नीट केला नव्हता हे मला क्षणात समजले. सगळे अर्ज प्रज्ञावंत शिक्षणात करायला हवे होते आणि या चारही ठिकाणी त्या विषयातले संशोधक-प्राध्यापक नव्हते म्हणून केलेली तडजोड चुकली होती.
सलगच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच फेब्रुवारीच्या २२ तारखेला कोलंबिया विद्यापीठाची इमेल मिळाली. झोपेतच मी ती पाहिली आणि वेबसाईटवर जाऊन लगेच निकाल बघण्यापेक्षा 'नंतर बघू, आत्ता झोप खराब करून नकार बघण्यात काही अर्थ नाही', असे म्हणून पुन्हा झोपलो. दोन तासांनी पुन्हा इमेलची आठवण आली. घरात कोणीच नव्हतं. धीर करून 'जे असेल ते असेल' म्हणून मोठा श्वास घेतला आणि निकालाचे पान उघडले. मला काही कळण्यापूर्वीच त्या पानावर रंगीबेरंगी रिबीन्स उमटल्या. माझा विश्वासच बसेना. मी पत्र वाचायला घेतले. "अभिनंदन! कोलंबिया विद्यापीठाच्या टीचर कॉलेजमध्ये आपली निवड झाली आहे." मी ताडकन उठून बसलो. तीन वेळा मी ते पत्र संपूर्ण वाचलं. मला काही केल्या विश्वास बसत नव्हता. घरात कोणीच नसल्याने मला कशा पद्धतीने व्यक्त होऊ हेच कळेना. मी तातडीने आईला फोन लावला पण ती शाळेत असल्याने तिने फोन घेतला नाही. अंतराला फोन केला तर ती पण महाविद्यालात होती. बाबांनीही फोन घेतला नाही. यांना सांगितल्याशिवाय कोणालाही सांगायचे नाही हे तर पक्कं होतं. मी घरात वेड्यासारखा नाचत होतो, ओरडत होतो. कोणीच फोन उचलत नाहीये म्हणून अस्वस्थ झालो होतो. सतत फोन फिरवत होतो.
थोड्यावेळाने आईने फोन घेतला. तिला बातमी सांगता सांगता गळा भरून आला. असा हर्षवायू मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. आयुष्यातलं एक स्वप्न पूर्ण होताना मला दिसत होतं. माझ्या बोस दलाच्या सहकाऱ्यांच्या गटावर मी डेस्परेटली मेसेज केला - "कोणी आहे का ऑनलाईन?" त्या दिवशी इतकी आई घरी परत येण्याची वाट मी कधीच पाहिली नव्हती. संध्याकाळी कुंड्या, टोनी, विराज, एल्बीसोबत खाऊगल्लीत पास्ता खाताना मी आयुष्यात पहिल्यांदाच न्यूयॉर्क शहराचा नकाशा उघडला. 120th Street, New York, NY हा पत्ता शोधताना तेव्हा माझ्या अंगावर सरसरून शहारा आला. (क्रमश:)
बब्बू
०३.०९.२०१८

Surekh shabdankan!!pudhil bhagachi utsukata!!
ReplyDeleteधन्यवाद माते ! सारी तुमची कृपा..
Deleteसुरेख! पुढच्या भागाची वाट पाहतोय. !!
ReplyDeleteधन्यवाद स्वागत. पुढचा भाग आत्ताच लिहिला. :)
DeleteKhup chan
ReplyDeleteKhup chan
ReplyDelete