Skip to main content

बाकरवडी ते बरीटो - भाग १: माझे जीआरीपुराण

गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला बाप्पाचं विसर्जन झालं. अंगात जितकी ताकद होती तितकी सगळी लावून रात्रीची मिरवणूक वाजवली. बहुतेक हीच आपली पुण्यातली शेवटची मिरवणूक ठरणार अशी शंका मनात होती. त्यामुळे सुरुवातीलाच कमरेला बांधलेला ताशा शेवटपर्यंत काही मी सोडला नाही. वाद्यांची आवराआवर संपवून घरी येऊन झोपलो ते थेट दुसऱ्या रात्री जेवायलाच उठलो. PhD ला कुठेतरी भारताबाहेर प्रवेश घेण्याचा विचार त्याआधी वर्षभर मनात रेंगाळत होता पण त्यासाठी लागणारी तयारी करायला मुहूर्त लागत नव्हता. बाप्पाचं विसर्जन झालं की तयारी सुरु करायची असं काहीसं ठरवलेलं.

तर, ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री GRE च्या परीक्षेची माहिती वाचायला घेतली. ETS ची वेबसाईट, काही ब्लॉग्स वगैरे वाचून काढले. काय काय तयारी करायला लागते हे नोंदवायला घेतलं. दुसऱ्या बाजूला हार्वर्ड, कोलंबिया वगैरे विद्यापीठांच्या संकेतस्थळांवर जाऊन माहिती वाचायला घेतली. उगाचच मोठालं अवाढव्य स्वप्नरंजन सुरु झालं.  आणि काही क्षणांमध्येच भानावर आलो - GRE ची तारीख! २ ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशला जायचं नियोजन आधीच ठरलेलं आणि ते रद्द करण्याचा व्याभिचारी विचार मनाला शिवणं शक्यच नव्हतं. त्यानंतरची तारीख घ्यायची म्हणजे फारच उशीर झाला असता आणि त्यापूर्वी २८ सप्टेंबर तारीख मिळत होती. म्हणजे तयारीला जेमतेम २१ दिवस! पोटात खड्डाच पडला. मोठाली स्वप्नं आणि इवलासा वेळ. आपण उशीर केला याची पक्की खात्री पटली. पण हार मानेल तो पुणेकर कसला! नाही म्हणलं, करायचंच! घेतली २८ तारीख...

GRE ची तयारी म्हणजे ते अवघड इंग्रजी शब्द, त्यांचं पाठांतर, निबंध लेखन वगैरे वगैरे भयकथा ऐकून होतो. ब्रिटीशाच्या बापानंसुद्धा फारसे कधी न वापरलेले शब्द पाठ करायचे म्हणजे माझ्यासारख्या सदाशिव पेठेत वाढलेल्या आणि वनितासमाज-ज्ञानप्रबोधिनीत शिकलेल्या मराठलेल्या मुलासाठी एक अग्निदिव्यच होतं. धीर करून 'ए' पासून शब्दयादी शिकायला सुरुवात केली. थोडेथोडके नाही आठशे शब्द होते आठशे. मुळातच पाठांतराला विरोध. त्यामुळे ऐन थंडीत सकाळच्या शाळेसाठी तयार व्हायला लहान पोराला त्याची आई जशी फरपटत नेते अगदी तसंच मी माझ्या मनाला हिसके देऊन देऊन ओढत होतो. एकतर रात्रीचं कट्ट्यावर जाणं वगैरे बंदच केलं होतं. अत्यंत रहदारीचे whatsapp चे ग्रुप्सदेखील सोडले होते. अभ्यास व्हावा म्हणून काय नाही केले?! तरीही एक एक दिवस सरकत होता तसा अभ्यासासाठी सुट्टी टाकायला लागणार याची खात्री पटली. अभ्यासासाठी सुट्टीचा अर्ज करायचा या कल्पनेनेही मला मळमळल्यासारखं झालं. पण अखेर लाज आणि नाईलाज या युद्धात नाईलाजाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि मी १० दिवसाची सुट्टी टाकून घरी बसलो. "घरी बसून अभ्यासच कर. बाकीचे धंदे बंद ठेव जरा.", हा प्रेमळ (?!) सल्ला द्यायला माझ्या बॉस विसरल्या नाहीत.

Source: www.theodysseyonline.com

मग काय! घरी बसून जागरणं करून कसाबसा अभ्यास सुरु केला. शब्दयादीमधले १००-१०० शब्द एकेका दिवसात उडवत चाललो होतो पण 'पुढचे पाठ मागचे सपाट' या नियमाप्रमाणे काम चालू होते. शब्दकोशाचं app वगैरे डाउनलोड करून 'Surprise me' वगैरे सारखे खेळ खेळण्यात मन रमवलं. कैक हजार रुपये खर्चून GRE ची तारीख आपण घेतो, त्यासोबत २ फुकट (?!) सराव-चाचण्या मिळतात. त्या थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने सोडवल्या आणि मिळालेले गुण पाहून 'मराठी माध्यमाची आपली पार्श्वभूमी आहे' अशी स्वतःच्या स्वप्नांना आठवण करून दिली! एका बाजूला स्वभावाशी न जुळणारी (जुलमी) परीक्षा आणि दुसऱ्या बाजूला मर्यादित वेळ. त्यामुळे या गुणांमध्ये आता फारशी काही वाढ अजून होऊ शकेल अशी शक्यता वाटत नव्हतीच. 'परीक्षेतले गुण म्हणजेच काही सगळं नसतं' हे माझं हक्काचं अस्त्र मी स्वतःच्या मनावर वापरलं आणि स्वतःची समजूत घालून घेतली.

अखेर मुंबईतल्या गोरेगावच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात जाऊन मी २८ तारखेला परीक्षा दिली आणि उमरकैदेतून सुटलेल्या कैद्याच्या आविर्भावात पुणं गाठलं. सराव परीक्षेपेक्षा जास्त मिळालेले ४-५ गुण हाच आपला नैतिक विजय आहे या आनंदात दुसऱ्याच दिवशी भराभर बोचकं बांधलं आणि अरुणाचलला धूम ठोकली. तीन आठवड्यांच्या मानसिक अत्याचारांनंतर आता मला एका 'ब्रेक'ची गरज होती. (क्रमश:)

बब्बू
२४.०९.२०१८
वेस्ट लाफियात, अमेरिका

भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ८
भाग ९
भाग १०

Comments

  1. भाषा रे तुझी!!!आवडलं! सहज पोहोचतोस लोकांपर्यंत!!

    ReplyDelete
  2. मी पण GRE देऊ का सर? 😂😂😂 आम्हाला तर हाकलवून देईल ब्रिटिश सरकार! कारण शेवटी मनपा शाळा! हाडामासानं मराठी!!😂😂 बाकी पुढच्या भागाची वाट बघतोय.. आतुरतेने!!

    ReplyDelete
    Replies
    1. बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवायचा आणि असे बोलायचे? बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठ अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिकसमध्ये शिकले.. ते आपले आदर्श.. नक्की जमेल आपल्याला

      Delete
  3. Arre tari kelach na sagle, tula kahi na jamna shakech nahi.Blog war tari touch madhe rahat jau ya.

    ReplyDelete
    Replies
    1. असं नाहीये आरतीताई.. काहीच येत नाही अजून..खूप काही बाकी आहे शिकायचं.. शिकतोय.. लिहिण्याचा प्रयत्न करत राहीन..

      Delete
  4. भारीच रे दादा
    ज्या गोष्टीची उत्सुकता होती त्यासाठी तुझे आत्मचरित्र येईपर्यंत थांबाव लागल नाही,...
    .
    .
    हट्टी आहेस भावा एक नंबरचा

    ReplyDelete
    Replies
    1. काय चेष्टा कराल.. हां, हट्टी आहे हे नक्की

      Delete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  6. तू कधीच पुण्याबाहेर नव्हतास आणि नसशील. अजून पण इथेच आहेस अस जाणवतं. काळजी घे. आणि पुढचा भाग लवकरच वाचायला दे.

    ReplyDelete
  7. Take care Akash and All the best!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Is it all about sex?

Shocked by the title? Or maybe excited? Maybe you are thinking that I have gone crazy to talk about 'this' thing. Maybe, you will be disappointed with what I am going to write. In any case, since you are already here, do read till the end. Read because this is a true story about someone's private life and not-so-private life. In October 2014, I met a person with a beautiful voice. She sang a melodious Kannada bhajan. I and my friends sat around her to listen to her story, a story that was unheard of, a story which was not even close to our realities. She narrated 'her' story..a story of a transgender! Akkai is her name today but she was born as Jagadish. ...I was born as a male child, a child with male private parts. Born into an upper caste family and father serving in the Air Force, it was herculean to come out to them. My brother had married a Christian girl and was excommunicated. Then sister married a Dalit boy and was excommunicated too. At the tender ag...

दुसरीच्या गणिताचं कोडं

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) संख्या वाचन आणि लेखनाची नवीन पद्धत आणली आहे. त्यावर सामाजिक माध्यमातून बरीच चर्चा झाली हे चांगलं झालं. या निमित्ताने शिक्षणासारखा महत्वाचा विषय चर्चेत आला. याबद्दल थोडक्यात... १. एकवीस , बावीस..च्या जोडीने वीस एक , वीस दोन ही पद्धत पुस्तकात आणली आहे. ही निश्चितच तुलनेने सोपी आहे याची कारणे शिक्षणशास्त्राच्या नजरेतून पुढीलप्रमाणे -   १.१ ' दशक आणि एकक पद्धतीमध्ये १० एकक एकत्र करून दशक होतो आणि त्यात पुढे एकक जोडत गेले की मोठ्या संख्या तयार होतात ' ही मांडणी प्राथमिक इयत्तांमधली पुस्तकांमध्ये मांडली जाते. यातील दशक-एकक क्रम महत्वाचा आहे. Concrete to abstract या pedagogical तत्त्वाला अनुसरून दहा एककांची मोळी तयार करणे अशा क्रियांना महत्व दिले गेले आहे. हा बदल 2005 च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणापासून जास्त स्पष्टपणे मांडला आहे. संख्या वाचनाचा नवीन बदल हा त्याच धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. म्हणून हा बदल गणित अध्यापनाच्या दृष्टीने शास्त्रीय ठरतो .  १.२ 'दशकाकडून एककाकडे'  हा  क्रम...

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...