आज मी थोडा मागे जाणार आहे. पर्ड्यू कि कोलंबिया या द्वंद्वाचा निकाल लागेना तेव्हा 'परत आल्यावर बघू' असे म्हणून मी अरुणाचलला निघून गेलो. निर्णय काहीही झाला तरी अमेरिकेला जाण्यापूर्वी अरुणाचलचा हा शेवटचा दौरा ठरणार अशी मनात धाकधूक होती. गेल्या ३ वर्षांत मी अरुणाचलचे ७ दौरे केले होते. तिथल्या मुलांसाठी प्रज्ञा विकास कार्यक्रम राबवत असताना त्या निसर्गभूमीशी खूप जवळचे नाते जडले होते. विशालकाय ब्रह्मपुत्र, रोइंगची नितळ देवपानी नदी, झिरोचे ते खुणावणारे डोंगर, मिचमिच्या डोळ्यांची लाजरीबुजरी पोरं, त्यांचं ते विशेष हिंदीतून बोलणं, आपल्यावर जीवापाड प्रेम करणं आणि कधीच ते व्यक्त न करता येणं हे सगळं माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेलं होतं. हे सगळं मागे सोडून यायचं या कल्पनेनीच मला कसंतरी होत होतं. गुवाहाटी रेल्वे स्थानकावरून सोनलताई, मृण्मयी, स्वरूपाचा निरोप घेताना सगळं एकदम भरून आलं आणि तिथेच स्पष्ट झालं होतं की आपलं काही खरं नाही. अरुणाचलच्या सुदूर पूर्वेला रोइंग नावाचे शहर आहे. भारताच्या सीमावर्ती भागातल्या विवेकानंद केंद्राच्या ७ शाळांचे विद्यार्थी तिथे वर्षातून ३ वेळा शिबिरां...