१०व्या वाढदिवसाच्या दिवशी आमचे परमबंधू अर्णवशेट जायस्वाल आणि त्यांच्या कुतूहलास सप्रेम भेट... १६ डिसेंबर म्हणजे आमच्या मातोश्रींचा जन्मदिवस. बांग्लादेशची निर्मितीदेखील याच दिवशीची. काय योगायोग म्हणावा! असो! नेहमीप्रमाणे मी प्रबोधिनीतून उशिराच घराकडे निघालो. काय सुबुद्धी सुचली आणि कधी नव्हे ते मी आधी फोन केला. आई आज्जीकडे होती. गाडीला टांग मारली आणि आम्हीही थेट पोहोचलो आमच्या मामाच्या किल्ल्यावर. तिथे आमच्या 'माईसाहेबांचे', म्हणजे आमच्या आज्जीचे राज्य चालते. गेलो ते थेट जेवणाच्या ताटावर बसलो तेव्हाच लक्षात आले कि शेवटच्या पंक्तीला फक्त आज्जी साथ द्यायला थांबलीये म्हणजे आपल्या पोटातली जागा आता ओढून ताणून का होईना मोठी करायला लागणार! त्यावर एक विस्तृत विवेचन लिहिता येईल. असो! जसा ताटावर बसलो तसा कुठून तरी आमचा अर्णव तिथे उपटला आणि मला बघताच टूणकन माझ्या मांडीवर येऊन बसला. अर्णव म्हणजे आमच्या धाकट्या मामासाहेब पेशव्यांचा थोरला बाजीराव. वय वर्षे १०! यत्ता ५वी'. पण डोळ्यावर 'अतीव अभ्यासूपणाचा' साक्षी पुरावा देणारा, एकसारखा नाकावरून खाली घसरणारा चष्मा आणि पेशव्यांना...