ज्ञान प्रबोधिनीतर्फे सुरु करण्यात आलेल्या 'प्रज्ञावंतांचे शिक्षण: पद्धती आणि धोरणे' या नाविन्यपूर्ण पी.जी. डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या निमित्ताने लिहिलेला लेख दैनिक सकाळने ५ ऑगस्ट २०१५ च्या संपादकीय पानावर छापला. भारतातील या विषयावरचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. त्या निमित्ताने..
सर्व मुलांना समान शिक्षण देण्याच्या प्रयत्नात शाळांमधल्या तीक्ष्ण बुद्धीच्या मुलांचा वेगळा विचार सध्याच्या शिक्षणक्रमात, शिक्षण-पद्धतींमध्ये आणि शैक्षणिक धोरणात मागे पडला आहे. असामान्य बुद्धिमत्तेची मुले सर्वच समाजगटांमध्ये आढळून येतात. अगदी शाळांमध्ये आणि चहाच्या टपरीमध्ये सुद्धा. गावात आणि शहरात आणि अगदी आदिवासी पाड्यावर सुद्धा. अश्या मुलांमध्ये असामान्य स्मरणशक्ती, अद्भुत कल्पकता, अफलातून विनोदबुद्धी, उत्तम तार्किक शक्ती नजरेस येते. ‘काहीतरी वेगळीच चुणूक आहे’ असं आपण नकळत म्हणून जातो. परंतु अश्या वेगळ्या क्षमतांच्या मुलांचा विचार आपण शिक्षणव्यवस्थेत करतो आहोत का याबद्दल हा लेखनप्रपंच.
‘प्रज्ञावंतांचे शिक्षण’ हा विषय आपल्या भारत देशात खूपच कमी प्रमाणात अभ्यासला गेला आहे. या विषयाबद्दल अनेक गंभीर गैरसमज समाजात सर्वत्र दिसतात. सरकारी पातळीवर सुद्धा या विषयीची उदासीनता सर्वत्र दिसते. बहुतेक कोणत्याच शहरी किंवा ग्रामीण शाळांमध्ये अश्या ‘वेगळ्या’ मुलांसाठी फारश्या वेगळ्या योजना केलेल्या आढळत नाहीत. त्यात देखील ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या मुलांना शहरी भागातील मुलांच्या तुलनेत फारच कमी सोयी, सुविधा आणि शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होतात. किंबहुना जगात मात्र अन्य अनेक देशांमध्ये ‘प्रज्ञावन्तता’ या विषयाचा सखोल अभ्यास केला गेला आहे. अनेक देशांमध्ये तर प्रज्ञावंत मुले-मुली ही देशाची संपत्ती म्हणून जपली जातात. त्यांच्या योग्य पोषणासाठी आणि वाढीसाठी विशेष प्रयत्न घेतले जातात. त्या त्या भागातील प्रज्ञावन्तांसाठी विशेष सरकारी आणि बिगर-सरकारी योजना राबविल्या जातात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका. रशियाने अंतरिक्षात सर्वप्रथम उपग्रह सोडून अमेरिकेला शह दिला तेव्हा अमेरिकेने शैक्षणिक धोरणात बदल करून त्यांच्या देशातल्या बुद्धिमान मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. नंतर कायद्यामध्ये सुधारणा करून राष्ट्रीय पातळीचा कार्यक्रम देखील राबविला.
भारतात मात्र या विषयातील फारच तुरळक प्रयोग झाले आहेत. १९८०-९० च्या दशकात ग्रामीण भागातील प्रज्ञावंत मुलांचा शोध घेतला जाऊन त्यांच्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयांच्या योजनेतून स्वतंत्र वेगळ्या शाळा देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये उघडल्या गेल्या. त्यानंतर पुण्यातील विद्यानिकेतन शाळा, दिल्ली मध्ये राजकीय प्रतिभा विकास विद्यालये, झारखंड मधील नेतरहाट आवासीय शाळा इत्यादी विशेष शाळांची स्थापना काही ठिकाणी झाली. या शाळांमधून सामान्य बुद्धिमत्तेपेक्षा जास्त क्षमतेच्या परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी विशेष शिक्षणाची सुरुवात झाली. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, ऑलिम्पियाड, होमी भाभा, गंधर्व महाविद्यालयाच्या संगीताच्या परीक्षा, जिल्हापरिषदेच्या क्रीडा स्पर्धा वगैरे मधून शालेय वयोगटातील प्रज्ञेला चालना मिळते आहे.
मात्र त्याच्या कितीतरी आधी म्हणजे १९६९ साली पुण्यात अप्पा पेंडसेंच्या कल्पनेतून ज्ञान प्रबोधिनी शाळेची सुरुवात झाली. बुद्धिमान मुलांना त्यांच्या क्षमतेचे बौद्धिक खाद्य लागते हे जसे खरे तसेच ही बुद्धीमत्ता विधायक मार्गाला लावून तिचा उपयोग विविध सामाजिक समस्यांचा परिहार करण्यासाठी केला जाऊ शकतो हे देखील खरे असे ज्ञान प्रबोधिनीच्या प्रयोगातून सर्वांसमोर मांडण्यात आले. प्रबोधिनीने बुद्धिमान मुलांची वेगळी शाळा काढली ही त्यासाठीच. या व्यतिरिक्त कोलकाता येथील जगदीशचंद्र बसू प्रज्ञा केंद्र आणि अन्य काही केंद्रे कार्यरत आहेत.
परंतु तरी देखील वर सांगितलेल्या शाळांची आणि केंद्रांची संख्या एकूण प्रज्ञावंत मुलांच्या संख्येच्या तुलनेत फारच कमी आहे. तसेच अश्या प्रकारच्या वेगळ्या शाळा उघडण्यावर शासनापुढे आर्थिक आणि कायद्याच्या मर्यादादेखील आहेतच. म्हणून यासंदर्भात प्रज्ञावंत मुलांच्या वेगळ्या शैक्षणिक आणि भावनिक, सामाजिक गरजा लक्षात घेऊन त्याप्रकारचे शिक्षण त्यांना त्यांच्या नेहमीच्या शाळेत उपलब्ध करून देणे हे जास्त आवश्यक आहे. यातून वेगवेगळ्या प्रकारच्या विषयात (कला, क्रीडा, शालेय विषय ई.) असामान्य प्रतिभा असणाऱ्या मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्याची व्यवस्था त्यांच्या शाळेतच होईल. मुलांच्या शिक्षण हक्क कायद्याच्या संकल्पनेस देखील ते सुसंगत होईल. आणि सर्वात मुख्य म्हणजे या द्वारे भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या बुद्धिमत्तेची जोपासना करता येईल. परंतु हे जितके वाटते तितके सोपे मुळीच नाही. शाळांना यासाठी क्रमिक पाठ्यक्रमाभोवती केंद्रित असलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आशय जोडावा लागणार आहे. शिक्षकांना त्याप्रकारचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहेत.
यासाठी प्रथम बुद्धिमान मुलांच्या वेगळ्या प्रकारच्या गरजा कोणत्या याचा मानसशास्त्रीय अभ्यास करून त्याप्रकारचे शैक्षणिक धोरण आखणे हे महत्त्वाचे आहे. प्रज्ञावन्तता म्हणजे नेमके काय? प्रज्ञावंत कोण? वर्गात पहिला क्रमांक मिळवणारा विद्यार्थी म्हणजे प्रज्ञावंत का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे गरजेचे आहे.
खरं तर प्रज्ञावंत कोण किंवा प्रज्ञावन्तता कशाला म्हणायचे याची जगात ‘एक’ सर्वमान्य व्याख्या उपलब्ध नाही. बुद्धिमत्तेच्या मानसशास्त्रीय कसोट्या लावून त्यावरून बुद्ध्यांक काढण्याची पद्धत सर्वात रुजली आहे. १३० किंवा त्यावरील बुद्ध्यांक असला म्हणजे बुद्धिमान असे वर्षानुवर्षे मानले गेले आहे. किंवा, काही ठिकाणी जे विद्यार्थी आपल्या इयत्तेच्या २ किंवा जास्त वरच्या इयत्तेइतके शिकू शकतात अश्यांना बुद्धिमान मानले जाते. काही ठिकाणी तर अगदी लहान वयात (शालेय) प्रौढ वयाच्या तुलनेचे कौशल्य किंवा अभिव्यक्ती करणाऱ्या मुलांना बुद्धिमान मानले जाते. परंतु, थॉर्नडाइक, थर्सटन, गिलफोर्ड, गार्डनर आणि स्टर्न्बर्ग सारख्या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेबद्दल वर मांडलेला काहीसा संकुचित विचार खोडून काढून त्याऐवजी बहुआयामी विचार मांडला. यामध्ये बौद्धिक, सर्जनशील, कलात्मक, नेतृत्वात्मक, सांगीतिक अश्या अनेक अंगांचा समावेश केला गेला. तेव्हापासून जगात ‘प्रज्ञावन्तता’ या शब्दाची व्याप्ती वाढली आणि बुद्ध्यांकाच्या (IQ) जुन्या कल्पनेच्या जागी बहुआयामी बुद्धिमत्तेचा विचार सर्वमान्य झाला.
व्याख्येबद्दल जरी अनेक विचार असले तरी काही बाबतीत मात्र शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञांचे एकमत आहे. प्रज्ञावंतांच्या प्रगत बौद्धिक क्षमतांमुळे त्यांच्या इतरांपेक्षा वेगळ्या शैक्षणिक, मानसिक आणि भावनिक गरजा असतात. पाठान्तरावर दिलेला भर, अपुऱ्या आव्हानाचा अभ्यासक्रम, प्रज्ञावन्ततेबद्दल असणारे अज्ञान आणि गैरसमज, असंवेदनशील शिक्षक आणि शैक्षणिक रचना, मित्र आणि घरच्यांमुळे येणारा ताण, अपुरे पालकत्व आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव या सर्व गोष्टींमुळे अशी मुळात असलेली नैसर्गिक प्रज्ञा कोमेजून जाऊ शकते. प्रज्ञेच्या बहरण्यासाठी विशेष वेगळे प्रयत्न घ्यावे लागतात.
प्रज्ञावन्ततेबद्दल भारतीय समाजात अनेक गैरसमज आहेत. एक - बुद्धिमान मुले कमी प्रयत्नात यश मिळवू शकतात त्यामुळे त्यांच्या शिकण्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. अशी मुले स्वतंत्रपणे, आपापल्या बुद्धीच्या जोरावर यशस्वी होऊ शकतात. हा एक मोठा भयंकर गैरसमज आहे. खरे तर कोणत्याही प्रकारच्या प्रतिभेची अभिव्यक्ती होण्याकरिता प्रामाणिक आणि योग्य कष्ट घेण्याची गरज असतेच ना. दुसरा सामान्य गैरसमज म्हणजे अशी मुले शाळेत कायम वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण होतात. काही मुलांच्या बाबतीत हे खरे असले तरी अनेक प्रज्ञावंत मुलांमध्ये शैक्षणिक अपयश आढळून येते. परीक्षेत यश मिळवण्यासाठी लागणारी कौशल्ये ही अनेक वेळा वेगळीच असतात. क्षमता असूनही हे विद्यार्थी उत्तम निकाल (फक्त गुणांच्या बाबतीत नाही बर का!) देऊ शकत नाहीत. यामागे अनेक भावनिक गुंते असणं हे नैसर्गिक आहे. तिसरा सामान्य गैरसमज म्हणजे अशी मुले ही पुस्तकी किडे असतात किंवा अतिशय आगाऊ असतात आणि इतरांशी वागण्या-बोलण्याची कौशल्ये अविकसित असतात. काहींच्या बाबतीत हे खरे असले तरी याचा संबंध थेट त्यांच्या बुद्धिमत्तेशी लावणे हे फारसे सयुक्तिक नाही. इतके मात्र खरे कि अश्या मुलांमध्ये वाचनाची गोडी, अभ्यास करण्याबद्दलची अंत:प्रेरणा आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात दिसून येतो. परंतु या गुणवैशिष्ठ्यांमुळे अश्या मुलांना शाळेत अनेक वेळा चिडवले, डिवचले जाते. तर काही वेळेस पालक आणि शिक्षक अश्या मुलांचे अनाठायी कोडकौतुक करून त्यातून स्वतःची फुशारकी मारून घेतात. या दोन्ही प्रकारच्या वागणुकीचा नकारात्मक परिणाम मुलांवर होतो असे संशोधनातून आढळून आले आहे.
स्वतंत्रबुद्धी, विचार करण्याची प्रगत क्षमता, कुतूहल, तीक्ष्ण ग्रहणशक्ती, तर्कशुद्ध विचार, सर्जनशीलता, उत्तम स्मरणशक्ती, तीव्र संवेदनशीलता अश्या गुणवैशिष्ठ्यांमुळे प्रज्ञावंत मुलांच्या शैक्षणिक गरजा वेगळ्या प्रकारच्या असतात हे साहजिक आहे. बरोबरीच्या गटाला या मुलांची विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत विचित्र वाटू शकते. आणि आपल्याच वयाच्या गटात ही मुले विसंगत वाटू शकतात. त्यातून अनेक भावनिक गुंते तयार होतात. यासाठी अश्या मुलांना लहान वयात शोधून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करणे गरजेचे ठरते. आपली मुलगी फारच प्रश्न विचारून छळ करते असे काही पालकांना वाटते. तिच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत म्हणून गप्प केले जाते. याने मुळात असलेले नैसर्गिक कुतूहल मारले जाते. कल्पकतेबद्दलही हेच होऊ शकते.
आता अशी कल्पना करा कि तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात एकाच प्रकारचे काम करत आहात आणि ते काम करण्यात तुम्हाला कोणतेही आव्हान वाटत नाही. असे एकसुरी काम तुम्ही किती दिवस करू शकाल? तुमच्या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचे काम सततच करायला लागले तर तुम्ही ते दीर्घ काळ करू शकाल का? त्यात तुम्हाला आनंद आणि समाधान वाटेल का? त्यातून तुमच्या क्षमतांचा विकास होईल का? अजून वरच्या क्षमतेचे काम करण्यासाठी तुम्ही त्यातून तुमची तयारी होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जर नकारात्मक असतील तर प्रज्ञावंत मुलांच्या शैक्षणिक अनुभवांची कल्पना तुम्हाला करता येईल. एकाच आकाराचे कपडे जसे सर्वांना शिवून चालत नाहीत तसेच वेगवेगळ्या क्षमतांच्या मुलांसाठी एकाच प्रकारचे शैक्षणिक अनुभव देऊन कसे चालेल? आपल्याला मिळणाऱ्या शिक्षणातून आपल्या क्षमतांचा परिपूर्ण विकास करण्याचा आणि त्यातून प्रगती करण्याचा अधिकार प्रत्येक मुलाला नाही का?
प्रत्येक मुलाची छटा वेगळी. प्रत्येकाची आवड वेगळी. क्षमता वेगळी. एकूण चित्र कसे सुंदर होईल आणि त्यात प्रत्येक छटेला कसा न्याय मिळेल हे मात्र बघितले पाहिजे. प्रत्येकाचे वेगळेपण जपले गेले पाहिजे. चित्रकार म्हणून शिक्षकाची यात मोठी कसरत आहे. त्याला समाजातील इतरांकडून सहकार्य मिळाले पाहिजे. प्रज्ञावंतांची छटा आपल्या देशात फारशी उलगडून पाहिलेली नाही. गेली ५० वर्षे ज्ञान प्रबोधिनीमध्ये या छटेच्या मानसशास्त्राचा अभ्यास आणि त्यांच्यासाठी शैक्षणिक प्रयोग चालू आहेत. त्यातील पुढचे पाउल म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने ‘प्रज्ञावंतांचे शिक्षण: पद्धती आणि धोरणे’ ह्या पी. जी. डिप्लोमाचा श्रीगणेशा करतो आहोत. या क्षेत्रात काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार व्हावे हाच यामागचा हेतू आहे.
आकाश चौकसे
ज्ञान प्रबोधिनी – प्रज्ञा मानस संशोधिका
पुणे
पुणे
Wwa...khupach chhan !!
ReplyDelete