चेंडू गणिक खोलीतलं वातावरण तंग होत चाललं होतं. 160 च्या आव्हानासमोर भारताचे 5 गडी स्वस्तात तंबूत परतले होते. कोहली आणि पांड्या तेव्हढे टिकून उभे होते. 8 चेंडूत 28 धावा हव्या होत्या. "अगली दो गेंदों पे दो छक्के लग जाये तो फिरभी कितने रन्स बनाने होंगे इनको," अहमद मजेत म्हणला. "सोलह," मी पटकन म्हणलं. "मनहूस, तू पीटने वाले काम मत कर," आमेर त्याला म्हणला. मी खुर्चीत नर्वस बसलो होतो. चार पाकिस्तानी मित्रांसोबत मी भारत-पाकिस्तान सामना बघत होतो. बे एरियातल्या सनीवेलमध्ये माझी पाकिस्तानी मैत्रीण हुमाकडे मी वीकएंडसाठी आलो होतो. तेव्हा मला भारत-पाकिस्तान T20 विश्वचषकाचा सामना आहे हेही माहीत नव्हतं. सचिन-गांगुली-द्रविड नंतर क्रिकेट बघण्यात फारसा रस उरला नव्हता. हुमाचा नवरा सकाळी म्हणला, "मेरे कुछ दोस्त मॅच देखने मिलने वाले है| आप चलेंगे?" विचार केला च्यायला अशी संधी कधी मिळायची परत. आधीच भारत-पाकिस्तान सामना, त्यात विश्वचषक स्पर्धा, आणि त्यावर कहर म्हणजे एकट्याने पाकिस्तानी चाहत्यांसोबत बसून सामना बघायचा. "कितने बजे शुरू होना है मॅच," मी विचारलं....