रात्रीचे साडे दहा वाजले असतील. अमेरिकन निवडणुकीचे निकाल बघायला टीव्ही समोर बसणार इतक्यात फोन वाजला. "हां बोल रे, रामन," मी नेहमीच्या उत्साहात सुरूवात केली. समोरून काहीच उत्तर आलं नाही. माझ्या मनात शंकेची पाल चुकचकली. काहीतरी गडबड झाली आहे याचा अंदाज आला. रामन 24-25 वर्षांचा अतिशय बुद्धिमान आणि कष्टाळू विद्यार्थी. ऐन कोरोनाच्या साथीत शिक्षण पूर्ण होऊन नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधायचे त्याचे पूर्ण प्रयत्न चालू होते पण यश येईना. "काय झालं?" मी काळजीने विचारलं. कसेबसे शब्द गोळा करून तो बोलायचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला जड जात होतं. मला फक्त त्याचा हुंदका ऐकू आला.
"आय अॅम सॉरी," म्हणत रडू आवरायचा त्याने प्रयत्न केला, पण त्याला ते सगळं असह्य झालं होतं. तो मनमोकळेपणाने रडला. काही मिनिटं अशीच स्तब्ध गेली. हळूहळू तो बोलता झाला. गेले अनेक महीने घरी बसून असल्याने त्याचं दडपण रोज वाढत होतं. स्वतःच्या क्षमतांबद्दलचे प्रश्न मनात काहूर करत होते. त्यातच एका मैत्रिणीशी आज फोनवर बोलताना ती म्हणली, "अरे, इतर कितीतरी कमी deserving लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. तुला मिळत नाहीये म्हणजे आश्चर्यच आहे." त्याला बरं वाटावं या हेतूने जरी ती हे वाक्य बोलली असली तरी आधीच आत्मविश्वास डळमळीत झालेल्या रामनला त्या वाक्याने चांगलीच जखम झाली. तो आतून पार कोलमडला आणि त्यातूनच त्याला ट्रीगर बसला. बघा ना, असं एखादं वाक्य आपल्या तोंडातून किती सहजपणे निघून जातं आणि त्याचा परिणाम किती भयंकर होऊ शकतो!
"मला काहीच सुचत नाहीये. डोकं सुन्न झालंय. उद्याच्या जॉब इंटरव्ह्युला मी नाही जाणार. मी नाहीच बोलू शकणार काही," तो एकसलग बोलू लागला. त्याच्या आवाजात कंप होता, निराशा होती. वेदना होती. आजूबाजूच्या मित्रांना नोकऱ्या मिळत असताना रामनला सारखंच अपयश येत होतं. दिवस निघून जात होते तसा त्याचा धीर सुटत होता. नवीन कंपन्यांमधून मुलाखतीचे कॉल आल्यावर त्याला भीती वाटायला लागली होती. स्वतःबद्दलच्या प्रश्नांनी त्याची सकारात्मक विचार करण्याची क्षमता बंद पडली होती. जणू मनाने मेंदूकडची वाट अडवून धरल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. त्याला कुठूनही आशेचा किरण दिसेना. आत्मविश्वासच गमावून बसल्याने एखादी संधी आली तरी दडपण वाढतच जात होतं. तो निराशेच्या गर्तेत जात होता.
आजकल त्याला सकाळी गादीतून बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. काहीच काम करण्यात उत्साह वाटत नव्हता. कोणाला भेटण्यात रस नव्हता. स्वतःच्या प्रतिमेबद्दल शंका निर्माण झाल्या होत्या. मनातल्या मनात इतरांशी तुलना केली जात होती. त्याने आजपर्यंत कधीच अपयशाचा अनुभव घेतलेला नसल्याने यातून बाहेर कसं यायचं हेही त्याला सुधरत नव्हतं. डोकं अगदी सुन्न झाल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. गेल्या दोन-तीन महिन्यात आमच्यात अनेकदा गप्पा झाल्या; तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या. त्याने कधी मित्रांपाशी मोकळेपणाने त्याच्या अडचणी मांडल्या नव्हत्या. इतरांची मदत घेताना त्याला प्रचंड संकोच वाटायचा. घरच्यांशी म्हणावा तितका चांगला संवाद नव्हता. अनेक बाबतीतली त्याची मतं अगदी ठाम असल्याने विचार बदलण्याची लवचिकता कमी होती. आजूबाजूला संपूर्ण जगातच नोकरीचे प्रश्न तयार झालेले असताना आपण धीर धरला पाहिजे, चिकाटीने प्रयत्न करत राहिले पाहिजेत, स्वतःच्या क्षमतांबद्दल दृढ विश्वास बाळगला पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सकारात्मक राहून आशा कायम धरून ठेवली पाहिजे हे त्याला जमत नव्हतं. आज पहिल्यांदाच तो ब्रेकडाऊन मधून जात होता.
सगळं शांतपणे ऐकून घेतल्यावर मी त्याला एक यादी करायला सांगितली; स्वतःच्या क्षमतांची यादी. "तुला काय काय चांगलं जमतं; तुझ्यात कोणते चांगले गुण आहेत याची यादी कर, आणि मला एक तासाने पुन्हा फोन कर." नुकत्याच प्रकाशित झालेल्या Future of Jobs रिपोर्टचा सारांश बघायला सांगितला. येत्या काळात डेटा सायन्स, मशीन लर्निंग, औटोमेशन क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी वाढतच जाणार आहेत आणि तुझ्याकडे ही कौशल्य आहेत हे पुनः पुनः सांगितलं. त्याच रिपोर्टमध्ये येत्या पाच वर्षांसाठी लागणाऱ्या सगळ्यात महत्वाच्या दहा गुणांची यादी दिली आहे; ती बघायला सांगितली. या यादीतला एक गुण म्हणजे तणाव व्यवस्थापन आणि अपयशातून पुनः भरारी घेण्याची वृत्ती (resilience). कोरोना सगळ्यांची कठीण परीक्षा घेत असताना या गुणांची आपल्या युवकांना खूप गरज लागणार आहे, हे रोजच लक्षात येतंय. अतिशय होतकरू तरुण आज नोकरीसाठी झगडताना दिसत आहेत. यात अगदी आयआयटीतून शिकलेले तरुण सुद्धा आहेत.
![]() |
| Future of Jobs Report 2020: Top 10 Skills of 2025 |
आजपर्यंत आपण बौद्धिक गुणांवर भर दिला. आता या कठीण काळात गरज आहे ती म्हणजे मानसिक आणि सामाजिक गुणांवर भर देण्याची. पुस्तकातले मला किती समजते या सोबतच मुलाखत घेणाऱ्याच्या समोर ते किती प्रभावीपणे मांडता येते हे महत्वाचे ठरत आहे. भरघोस गुण मिळवून नोकरीसाठी लागणारे नेटवर्किंग महत्वाचे ठरत आहे. मग यात लोकसंपर्क तयार करणे आणि LinkedIn सारख्या सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करता येणे आवश्यक झाले आहे. मदत मागता येणे हे अजून एक महत्वाचे कौशल्य शिकले पाहिजे. एकट्याने कुढत बसण्यापेक्षा दुसऱ्याच्या मदतीने पुढे जाता आले पाहिजे. स्वतःचे मानसिक स्वास्थ्य ओळखता आले पाहिजे. मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गोष्टींपासून वेळीच दूर जाता आले पाहिजे. मग यात टॉक्सिक रिलेशनशिप पासून व्यसनांपर्यंत सर्व काही आले.
अजून काय? पैसे आणि नोकरीच्या पलीकडे जाऊन आयुष्यात पुढे काय मिळवायचे आहे याचा विचार करता आला पाहिजे. त्या मोठ्या उद्दिष्टाकडे अनेक मार्गांनी जाता येते हे समजले पाहिजे. विचारात आणि आचारात लवचिकता आणता आली पाहिजे. नवीन अनुभव घेण्यासाठी मनाचा मोकळेपणा तयार झाला पाहिजे. जोखीम घेण्याची कुवत तयार केली पाहिजे. आजूबाजूची परिस्थिती बदलत असताना बिग पिक्चर समोर ठेवून आपली चाल बदलता आली पाहिजे. आजच्या तरुणाई पुढे ही सर्व आव्हाने उभी आहेत. ती आधीही होती; पण कदाचित बदलत्या काळामध्ये या सगळ्याची गणिते बदलत आहेत. त्याची नोंद घेतली पाहिजे.
रात्री बाराच्या आसपास रामनचा पुनः फोन आला. निवडणुकांच्या निकालांबद्दल बोलताना तो मोकळेपणाने हसला. आता तो आधीपेक्षा बराच बरा वाटत होता. उद्या सकाळच्या मुलाखतीला जायची त्याची तयारी आहे असं त्याने सांगितलं. आम्ही मुलाखतीचा थोडा सराव केला, आणि तो झोपायला गेला. आज दुपारी त्याचा मला फोन आला. "आकाश, मुलाखत चांगली झाली. मी मोकळेपणाने गोष्टी मांडू शकलो. थॅंक यू. ते विचार करून पुढचं कळवणार आहेत." माझा जीव भांड्यात पडला. समाधान वाटलं. ही नाहीतर दुसरी नोकरी रामनला मिळणारच आहे. त्याबद्दल मला शंका नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक रामन आहेत. ते त्यांच्या मनातल्या शंकेवर मात करू शकतील का? आत्मविश्वास ढळू न देता आपयशावर धावून जावू शकतील का? वेळीच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी प्रयत्न करतील का? गरज पडेल तिथे प्रोफेशनल मदत घेतील का? बुद्धी गुणांना धार लावताना मनोगुणांवर काम करतील का? कोरोनाच्या पलीकडे एका नवीनच जगात आपण प्रवेश करतो आहोत. त्यासाठी स्वतःला फिट करू शकतील का? माझं उत्तर आहे -- नक्कीच करू शकतील!
आकाश चौकसे
वेस्ट लाफियात, अमेरिका
5 नोव्हेंबर 2020

दादा, मस्तच केली आहेस मांडणी। सर्वच मुद्दे लागू नसले, तरी अनेक मुद्दे, कालानुरूप आणि प्रसंगानुरूप अगदीच जवळचे वाटले। येत्या काळात ते अधिक जवळचे होणार आहेत, ब्लॉग चा गर्भार्थ नक्कीच डोक्यात राहील, त्या गोष्टींना सामोरं जातांना।
ReplyDeleteधन्यवाद, वरद. अशा प्रतिसादामुळे लिहिण्याची ऊर्जा वाढते.
Delete