आज एका पालकांशी त्यांच्या तरुण मुलाच्या मानसिक स्वास्थ्य विषयावर बोलण्याचा योग आला. गेली चार वर्षे कमी अधिक फरकाने मुलाचे मानसिक स्वास्थ्य अधून मधून बिघडताना जाणवत होते. एकटेपणा वाटणे, समोर उद्दिष्ट न दिसणे, कंटाळवाणे वाटणे, कशातही आनंदी न वाटणे, या विचारांनी डोकं बधिर होणे, उदास वाटणे, या सगळ्याबद्दल स्वतःला अपराधी मानणे अशा तक्रारी तो मला अधून मधून सांगत असे. या सगळ्यात पॅटर्न दिसायला लागल्यावर मी त्याला समुपदेशिकेकडेही जायला सांगितले. पण तेही त्याने नंतर बंद केले. गेल्या काही दिवसात त्रास वाढायला लागल्यावर मात्र त्याने घरी सांगितले पाहिजे याबद्दल मी आग्रह धरला. "घरचे काय म्हणतील", "ते काय मदत करू शकतील", "उलट मलाच दोष देतील" या विचारांनी तो घरी सांगायला तयार होईना. "तुझे पालक आहेत ते; समजावून सांगितलं तर नक्की समजावून घेतील; त्यांना संधी तर दे," असं सांगून त्याला तयार केलं. पण बोलायचं कसं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. प्रत्यक्ष बोलणं जड जाणार असेल तर कोणाच्या तरी माध्यमातून बोल किंवा पत्र लिही असं सुचवलं. त्यानुसार त्याने एक whatsapp संदेश तयार...