प्रिय ज्ञा पु, सप्रेम नमस्कार! आज तुम्हाला हे पत्र लिहिताना मनात खूप अस्वस्थता आहे. वेळ जणू काही मंदावला आहे. आज दिवसभर सतत मनात तुमच्या आठवणींनी काहूर माजलं होतं. आजवर तुमच्याशी बोलताना कधीच संकोच वाटला नाही, पण आज हे पत्र लिहिताना मात्र शब्द अडकतायेत. मागच्या महिन्यात आपण तुमच्या वाढदिवसाला बोललो. किती उत्स्फूर्तपणे तुम्ही "धन्यवाद बंधू आकाश" अशी साद घातली होतीत. कसं जमायचं तुम्हाला असं कोणालाही आपलंसं करून टाकायला? मेच्या शेवटच्या आठवड्यात तर आपण शिबिराला भेटलो. एका मेसेजवर तुम्ही शिबिरात विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला तयार झालात. स्व-रूपवर्धिनी सारख्या मोठ्या संस्थेचे कार्यवाह असूनही तुम्ही एका मेसेजवर "हो" म्हणलात. तुम्हाला एका साध्या फोनचीही अपेक्षा नाही वाटली? कुठून येतो हा साधेपणा? कसं जमतं अशा सर्व जगाला व्यापून उरलेल्या अहंचा त्याग करणं? तुमचा प्रतिसादही मला लाजवणारा होता. तुम्ही उत्तरात लिहिलंत, "अरे जरूर आकाश. आप सिर्फ आज्ञा करो. बंदा हाजीर. 😄" अहो ज्ञा पु, कोण असं इतकं स्वतःवर हक्क गाजवून घेतं? मी तुमच्याहून २० वर्षांनी लहान. तुमच्या कार्य कर्...