बंगाल दौऱ्याहून परतल्यावर मी प्रबोधिनीतील कामाचा तांत्रिक राजीनामा दिला. गेल्या वर्षभरातल्या घडामोडी झरझर डोळ्यासमोरून जात होत्या. गणपती बाप्पाचं विसर्जन, त्यानंतर जेमतेम वीस दिवसांत केलेली GRE च्या परीक्षेची तयारी, धावपळ करत गाठलेल्या अर्जांच्या डेडलाईन्स, कोलंबिया विद्यापीठाचा थरार, पर्ड्यू की कोलंबिया हे ठरवण्यात झालेली मानसिक ओढाताण, अरुणाचल प्रदेशचा एक भावपूर्ण दौरा, दलासोबत केलेला मणिपूर-बंगालचा प्रवास, ब्रह्मपुत्रेचं प्रेमपत्र, आणि गंगेचा अवघड निरोप! निरोप, किती अवघड गोष्ट! आपल्या हृद्य लोकांचा, इथल्या गुंफलेल्या नात्यांचा, या गंधभरल्या जमिनीचा, चविष्ट जेवणाचा एकाएकी निरोप.. पलीकडे काहीतरी मोठं खुणावत असताना हातातला रंगलेला डाव मोडून त्या अनागताच्या मागे जाण्यासाठी एकदा मागे वळून बघणं आणि पुन्हा तोच जुना डाव तसाच आधीसारखा रंगवायला मिळेल का नाही याची हूरहूर अनुभवणं हा मोठा अवघड प्रकार आहे. खुणावणाऱ्या पैलतीरासाठी ऐलतीर सोडण्याची भीती आणि पलीकडच्या गावी वाढून ठेवलेल्या अदृश्य शंकांचं एक भलंमोठं काहूर! तेवीस जुलैला व्हिसाच्या मुलाखतीचे सोपस्कार पार पडले आणि मन घट्ट करून १४ ऑगस...