बाकरवडी ते बरीटो लेखमाला लिहायला घेताना केवळ आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा प्रामाणिक हेतू मनात होता. भारतातील सर्वकाही तात्पुरता मागे सोडून पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला येण्याचा हा प्रवास आपल्या सर्वांशी संवादाच्या माध्यमातून वाटून घेताना खूप मजा आली. लिहिता लिहिता स्वतःचा प्रवास पुन्हा जवळून बघायला मिळाला. त्या सर्व कटू-गोड आठवणी आपल्या सर्वांसोबत वाटून घेताना आपल्या अनेक बोलक्या प्रतिक्रिया आल्या. त्यातूनच लिहिण्याची उमेद वाढली. आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. हा भाग ७० दिवसांच्या खंडानंतर लिहितोय. त्याबद्दल प्रथम माफी मागतो. जीआरईची परीक्षा आणि अर्जांची प्रक्रिया संपली. ७ नकार आणि २ होकार असे गणित समोर ठेवून मनाचा गुंता सोडवताना जरा दमछाक झाली. पर्ड्यू आणि कोलंबिया द्वंद्वाचा निकाल लावून पुण्यातला गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान अरुणाचल प्रदेशचा एक दौरा झाला. तिथल्या विद्यार्थ्यांचा निरोप घेताना झालेली घालमेल आणि ब्रह्मपुत्रेचा परत फिरण्याचा आदेश घेऊन पुण्यात परतलो. अरुणाचल हा मनातला एक हळवा कोपरा परंतु त्याहूनही खोलवर रुजलेला आणि गेल्या २० वर्षा...