जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...