एखाद्या कल्पनेने आपण भारावून जातो. त्याबद्दलचे मनोरे रचायला लागतो. कधीतरी अचानक ठरवून टाकतो त्या कल्पनेला मूर्त रूप द्यायचे. आणि मग लगबग सुरु होते. सोहळा उभा राहतो आणि सोहळा संपन्न होतो. धावपळ शमते तशी मागे वळून पाहताना मन रेंगाळते समाधानाच्या क्षणांपाशी. दमलेले शरीर बोलू लागते स्वतःशीच. आणि विश्रांतीचा विचार मनात येताच आठवण होते संकल्पाची...आठवण..
आठवण
थकलेले डोळे दोन
झोपताना म्हणती ..
सुट्टी घेऊ उद्या आता
स्वप्नांमध्ये फिरती /१/
दमलेले पाय दोन
गादीवरी पडती..
प्रवासाला पुढच्या न्या
नवे कुणी सोबती /२/
वाकलेली पाठ एक
घेऊ म्हणे विश्रांती..
दम घेते थोडा आता
जाऊ उद्या संगती /३/
गुंगलेले मन माझे
समाधानी रमती..
देऊनिया साक्ष त्याची
आनंदक्षण गणती /४/
लगबग मती मग
आठवण करती..
उठूनिया उद्या पुन्हा
लावायची पणती /५/
बब्बू
संवर्धन प्रज्ञेचे
18.2.2017
Wow... Inspiring
ReplyDeleteMiheer Karandikar