Skip to main content

Posts

Showing posts from April, 2016

ICU (आय. सी. यु)

(आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगणाऱ्या अनुभवामधून जन्मलेली कविता…) छताकडे डोळे लावून आतमध्ये थरथरत होता 'तो'... टिकटिक संपण्याची वाट बघत घंटेकडे डोळे लावून मंदिराबाहेर थिजली होती 'ती'... कौल येण्याची वाट बघत घड्याळाकडे डोळे लावून दरवाज्याबाहेर बसला होता 'चित्रगुप्त'... ड्युटी संपण्याची वाट बघत बसून राहिली तशीच रेंगाळत न सरकता 'वेळ'... पाट फुटण्याची वाट बघत मारत राहिले लाथा अथक चिवट खेळात 'चौघेही' 'दुसरे' थकण्याची वाट बघत!  बब्बू

पोशिंदा

आला वैशाख वणवा तरी चैत नाही आला लई तापली जमीन तळ आत्ताच गाठला माझा शेतकरी बाप केलं नाही त्यानी पाप पाणी नाही जमिनीला धार लागली डोळ्याला परी आभाळ फाटलं तरी आभाळ फुटंना पुरे झाली आता थट्टा कौल लावला देवाला अरे विठ्ठला विठ्ठला दाव थोडी दया माया गुरं सैराट सोडूनी येऊ कसा भेटायाला? घोषणांचा नाय तंटा मदतीचा तोरा मोठा माझा छोटा साभिमान इकू का रं सावकारा? नको नको भगवंता उपकार नको आता तुझ्या गाभाऱ्यात उभा उभ्या जगाचा पोशिंदा !  बब्बू पुणे २ एप्रिल २०१६