वेळ रात्री 1 ची. 'नटसम्राट' बघून सुन्न डोक्याने 'मंगला' मधून बाहेर पडलो. चांगलीच थंडी होती. 'To be or not to be' म्हणत स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न विचारणारा नटसम्राट, स्वतःच्या कर्तृत्वावर कमावलेल्या माजावर काळाने केलेली मात पाहून उध्वस्त झालेला नटसम्राट, प्रचंड प्रेम केलेल्या पोटच्या पोरांकडून अपमानित झालेला रंगभूमीचा दुभंगलेला नटसम्राट! कधी मुजोर, कधी हळवा, कधी निखळ, कधी लाचार भासणाऱ्या नटसम्राटाने डोक्यात वादळ उभं केलं होतं. त्याच अवस्थेत बाईक सुरु केली आणि बाहेर पडलो. महापालिकेसमोरच्या मुख्य रस्त्याला लागेपर्यंत थंडीने शरीराचा ताबा घेतला होता. नटसम्राटाची शोकांतिका मात्र मनातून काही दूर होईना. पण जमेल तितकया वेगात घर गाठून रजईत गुरफटून घेऊन झोपण्याचा विचार मनाला सुखावत होता. इतक्यात रस्त्याच्या कडेला तिरप्या झापेखाली चिकटून झोपलेली कुटुंबं दिसली. नदीच्या कडेला, गार वाऱ्याशी त्यांचं भांडण चालुये असा भास झाला. मग्रूर प्राक्तनाला दोष देण्याऐवजी जगण्याच्या चिवट बेदरकार इच्छेने थंडीशी त्यांचं जणू युद्ध चालू होतं. कुणी घर देईल का घर? - नटसम्राट...