परिस्थितीनं पोळलेली आणि शिक्षणापासून दूर राहिलेली ती मुलं होती. शिकण्यासाठी त्यांच्यामनात ऊर्मी दाटत होती; पण मार्गदर्शन आणि धीराचे चार शब्द हवे होते त्यांना भरारी घेण्यासाठी...
साधारण रात्री नऊची वेळ. शिवाजी मराठा शाळेसमोरच्या रस्त्यावर मी आणि आमच्या दलातील मुलं स्केटिंगचा सराव करत होतो. डिसेंबर महिन्यातील नुकतीच वाढू लागलेली थंडी आणि जानेवारीतल्या क्रीडा प्रात्यक्षिकातल्या सादरीकरणाची लगबग. अशातच एक मोठ्या डोळ्यांचा, थोडं पोट सुटलेला एका हाताने अर्धवट अपंग, डोळ्यात सुरमा लावलेला मुलगा लांबूनच आमच्याकडे टक लावून बघत होता. न राहवून थोड्या वेळांनी मीच त्याला विचारलं, "काय रे नाव काय तुझं?" "साबीर" त्याचं उत्तर आलं. त्याच्या त्या टपोऱ्या डोळ्यांमागची अस्वस्थ नजर ओळखून मी त्याला विचारले, "स्केटिंग शिकशील?" आणि तोही तितक्याच सहजपणे म्हणाला, "हॉं, हॉं, मुझे भी सिखाओगे?" आणि त्यानंतर तो आमच्यात सहजच आला.
पुढे तो रोज येत राहिला आणि आमची ओळख वाढत गेली. साबीर शेजारच्याच बंगल्यात घरगडी म्हणून काम करतो. 17-18 वर्षे वय. चार वर्षांपूर्वी अभ्यास डोक्यात शिरत नाही म्हणून त्याची शाळा सुटली आणि परत शाळेचा आणि साबीरचा कधीच संबंध आला नाही. त्याच्या घरच्यांनीही तो येऊ दिला नाही.
यानंतर काही दिवसांनी साबीरसारखीच परिस्थिती असलेला ओम- ज्याचे अकरावीतच शिक्षण सुटलेले, आज तो वॉचमनचे काम करीत आहे. साबीरचाच मित्र असल्याकारणाने तोही आमच्यात सहभागी झाला आणि आमच्यातलाच झाला.
एका रात्री मुलांसमोर मी शिक्षणाचं महत्त्व या विषयावर बोलत होतो. ऐकणाऱ्या मुलांमध्ये काही हिराबागेच्या वसाहतीमधील, तर बाकीचे मामलेदार कचेरी परिसरातील कनिष्ठ मध्यमवर्गातील मुलं दहावी ते बारावीच्या वर्षातील आपापल्या शिकवण्या संपवून रात्री 9 ते 11 स्केटिंगच्या सरावाला यायची. मी बोलत होतो, "शिकला नाहीत तर समाजात किंमत मिळणार नाही. सन्मान मिळणार नाही." अचानक ओम व साबीरच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. ओम म्हणाला, "शिक्षण सुटून चार वर्षं झालीत, आता कसं जमणार?" मी म्हणालो, "प्रयत्न तर करून बघ."
पुढे प्रबोधिनीच्या दुसऱ्या कामामुळे माझं शुक्रवार पेठेत येणं-जाणं कमी झालं. खूप दिवसांनंतर अचानक एक दिवस ओमचा फोन आला, "दादा, मला आशीर्वाद द्या. तुमच्यामुळे मी बारावीची परीक्षा देतोय. आज माझा पहिला पेपर आहे." ओम वयानं माझ्याहून मोठा होता. मी त्याला फक्त म्हणालो,"खूप खूप शुभेच्छा!" माझेही शब्द आटले होते. मी पुढे काही बोलू शकलो नाही. बारावीची परीक्षा पास होणारच, असा त्याने निर्धार केला होता. मला बरं वाटलं; चला आपण एक तरी पणती लावू शकलो, याचं समाधान वाटलं.
नेमका त्याच आठवड्यात साबीरचाही फोन आला, "दादा आप मुझे भूल गये ना?" त्यानं विचारलं. खरंच स्वतःच्या नोकरीमध्ये आणि दुसऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये साबीरचं मला विस्मरण झालं होतं. "दादा कब मिलेंगे?" त्यानं विचारलं. मी म्हणालो, "शनिवारी भेटू."
ठरविल्याप्रमाणे साबीर शनिवारी मला भेटायला आला. कॉफी पिता पिता गप्पा झाल्या. मी त्याला विचारलं, "क्या रे, पढाई का क्या सोचा है?" त्यावर तो उत्तरला, "पढने की बहुत उमंग है। लेकिन इंग्लिश और गणित से डरता हूँ। और अभी अम्मी भी बोलती है, की पढने की उम्र चली गयी। अब क्या करेगा पढके?" घरच्यांच्या नजरेत आता तो सुद्धा एक कमावता सदस्य झाला होता. मी म्हणालो,"आपण समजावून सांगू अम्मीला." डोळ्यांत एक नवी उमेद घेऊन साबीरनं माझा निरोप घेतला; पण त्याच्या प्रश्नांनी माझ्या डोळ्यांत वादळ निर्माण केलं. आज असे अनेक साबीर- ओम आपल्या सभोवताली आहेत. मेडिकल- इंजिनिअरिंग तर सोडाच; परंतु काही किमान शिक्षणापासून वंचित राहणारे आपले बंधू-भगिनी हे आपल्या समाजाची जबाबदारी नाहीत? अशा अनेक साबीरच्या डोळ्यांतील प्रश्नांची उत्तरे शोधणं, हे आपल्या सर्वांचं कर्तव्य नाही का? आपण महाविद्यालयीन तरुण वर्गानं रुटीनमधून काही वेळ काढला, तर अशा अनेक साबीरची इंग्रजीची भीती संपून जाईल.
शिक्षणापासून दूर जाणाऱ्या अनेक ओमला आपल्याला पुन्हा शिक्षणाकडे आणता येईल. भारताच्या प्रश्नांबद्दल फक्त कॉलेजकट्ट्यावर आणि एसी ऑफिसमध्ये चर्चा करण्यापेक्षा, सामाजिक भान ठेवून खारीचा वाटा उचलणं कधीही चांगलं! साबीरनं मला आज अचानक अनेक प्रश्नांची भेट दिली. प्रयत्न करतोय उत्तरं शोधण्याची. मग करणार ना मला मदत?
(२७ ऑगस्ट, २०१२ ला दैनिक सकाळ मधील मुक्तपीठ मसदरामध्ये प्रसिद्ध झालेला लेख...)
साधारण रात्री नऊची वेळ. शिवाजी मराठा शाळेसमोरच्या रस्त्यावर मी आणि आमच्या दलातील मुलं स्केटिंगचा सराव करत होतो. डिसेंबर महिन्यातील नुकतीच वाढू लागलेली थंडी आणि जानेवारीतल्या क्रीडा प्रात्यक्षिकातल्या सादरीकरणाची लगबग. अशातच एक मोठ्या डोळ्यांचा, थोडं पोट सुटलेला एका हाताने अर्धवट अपंग, डोळ्यात सुरमा लावलेला मुलगा लांबूनच आमच्याकडे टक लावून बघत होता. न राहवून थोड्या वेळांनी मीच त्याला विचारलं, "काय रे नाव काय तुझं?" "साबीर" त्याचं उत्तर आलं. त्याच्या त्या टपोऱ्या डोळ्यांमागची अस्वस्थ नजर ओळखून मी त्याला विचारले, "स्केटिंग शिकशील?" आणि तोही तितक्याच सहजपणे म्हणाला, "हॉं, हॉं, मुझे भी सिखाओगे?" आणि त्यानंतर तो आमच्यात सहजच आला.
पुढे तो रोज येत राहिला आणि आमची ओळख वाढत गेली. साबीर शेजारच्याच बंगल्यात घरगडी म्हणून काम करतो. 17-18 वर्षे वय. चार वर्षांपूर्वी अभ्यास डोक्यात शिरत नाही म्हणून त्याची शाळा सुटली आणि परत शाळेचा आणि साबीरचा कधीच संबंध आला नाही. त्याच्या घरच्यांनीही तो येऊ दिला नाही.
यानंतर काही दिवसांनी साबीरसारखीच परिस्थिती असलेला ओम- ज्याचे अकरावीतच शिक्षण सुटलेले, आज तो वॉचमनचे काम करीत आहे. साबीरचाच मित्र असल्याकारणाने तोही आमच्यात सहभागी झाला आणि आमच्यातलाच झाला.
एका रात्री मुलांसमोर मी शिक्षणाचं महत्त्व या विषयावर बोलत होतो. ऐकणाऱ्या मुलांमध्ये काही हिराबागेच्या वसाहतीमधील, तर बाकीचे मामलेदार कचेरी परिसरातील कनिष्ठ मध्यमवर्गातील मुलं दहावी ते बारावीच्या वर्षातील आपापल्या शिकवण्या संपवून रात्री 9 ते 11 स्केटिंगच्या सरावाला यायची. मी बोलत होतो, "शिकला नाहीत तर समाजात किंमत मिळणार नाही. सन्मान मिळणार नाही." अचानक ओम व साबीरच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. ओम म्हणाला, "शिक्षण सुटून चार वर्षं झालीत, आता कसं जमणार?" मी म्हणालो, "प्रयत्न तर करून बघ."पुढे प्रबोधिनीच्या दुसऱ्या कामामुळे माझं शुक्रवार पेठेत येणं-जाणं कमी झालं. खूप दिवसांनंतर अचानक एक दिवस ओमचा फोन आला, "दादा, मला आशीर्वाद द्या. तुमच्यामुळे मी बारावीची परीक्षा देतोय. आज माझा पहिला पेपर आहे." ओम वयानं माझ्याहून मोठा होता. मी त्याला फक्त म्हणालो,"खूप खूप शुभेच्छा!" माझेही शब्द आटले होते. मी पुढे काही बोलू शकलो नाही. बारावीची परीक्षा पास होणारच, असा त्याने निर्धार केला होता. मला बरं वाटलं; चला आपण एक तरी पणती लावू शकलो, याचं समाधान वाटलं.
नेमका त्याच आठवड्यात साबीरचाही फोन आला, "दादा आप मुझे भूल गये ना?" त्यानं विचारलं. खरंच स्वतःच्या नोकरीमध्ये आणि दुसऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये साबीरचं मला विस्मरण झालं होतं. "दादा कब मिलेंगे?" त्यानं विचारलं. मी म्हणालो, "शनिवारी भेटू."
ठरविल्याप्रमाणे साबीर शनिवारी मला भेटायला आला. कॉफी पिता पिता गप्पा झाल्या. मी त्याला विचारलं, "क्या रे, पढाई का क्या सोचा है?" त्यावर तो उत्तरला, "पढने की बहुत उमंग है। लेकिन इंग्लिश और गणित से डरता हूँ। और अभी अम्मी भी बोलती है, की पढने की उम्र चली गयी। अब क्या करेगा पढके?" घरच्यांच्या नजरेत आता तो सुद्धा एक कमावता सदस्य झाला होता. मी म्हणालो,"आपण समजावून सांगू अम्मीला." डोळ्यांत एक नवी उमेद घेऊन साबीरनं माझा निरोप घेतला; पण त्याच्या प्रश्नांनी माझ्या डोळ्यांत वादळ निर्माण केलं. आज असे अनेक साबीर- ओम आपल्या सभोवताली आहेत. मेडिकल- इंजिनिअरिंग तर सोडाच; परंतु काही किमान शिक्षणापासून वंचित राहणारे आपले बंधू-भगिनी हे आपल्या समाजाची जबाबदारी नाहीत? अशा अनेक साबीरच्या डोळ्यांतील प्रश्नांची उत्तरे शोधणं, हे आपल्या सर्वांचं कर्तव्य नाही का? आपण महाविद्यालयीन तरुण वर्गानं रुटीनमधून काही वेळ काढला, तर अशा अनेक साबीरची इंग्रजीची भीती संपून जाईल.
शिक्षणापासून दूर जाणाऱ्या अनेक ओमला आपल्याला पुन्हा शिक्षणाकडे आणता येईल. भारताच्या प्रश्नांबद्दल फक्त कॉलेजकट्ट्यावर आणि एसी ऑफिसमध्ये चर्चा करण्यापेक्षा, सामाजिक भान ठेवून खारीचा वाटा उचलणं कधीही चांगलं! साबीरनं मला आज अचानक अनेक प्रश्नांची भेट दिली. प्रयत्न करतोय उत्तरं शोधण्याची. मग करणार ना मला मदत?
(२७ ऑगस्ट, २०१२ ला दैनिक सकाळ मधील मुक्तपीठ मसदरामध्ये प्रसिद्ध झालेला लेख...)
Comments
Post a Comment