परिस्थितीनं पोळलेली आणि शिक्षणापासून दूर राहिलेली ती मुलं होती. शिकण्यासाठी त्यांच्यामनात ऊर्मी दाटत होती; पण मार्गदर्शन आणि धीराचे चार शब्द हवे होते त्यांना भरारी घेण्यासाठी. .. सा धारण रात्री नऊची वेळ. शिवाजी मराठा शाळेसमोरच्या रस्त्यावर मी आणि आमच्या दलातील मुलं स्केटिंगचा सराव करत होतो. डिसेंबर महिन्यातील नुकतीच वाढू लागलेली थंडी आणि जानेवारीतल्या क्रीडा प्रात्यक्षिकातल्या सादरीकरणाची लगबग. अशातच एक मोठ्या डोळ्यांचा, थोडं पोट सुटलेला एका हाताने अर्धवट अपंग, डोळ्यात सुरमा लावलेला मुलगा लांबूनच आमच्याकडे टक लावून बघत होता. न राहवून थोड्या वेळांनी मीच त्याला विचारलं, "काय रे नाव काय तुझं?" "साबीर" त्याचं उत्तर आलं. त्याच्या त्या टपोऱ्या डोळ्यांमागची अस्वस्थ नजर ओळखून मी त्याला विचारले, "स्केटिंग शिकशील?" आणि तोही तितक्याच सहजपणे म्हणाला, "हॉं, हॉं, मुझे भी सिखाओगे?" आणि त्यानंतर तो आमच्यात सहजच आला. पुढे तो रोज येत राहिला आणि आमची ओळख वाढत गेली. साबीर शेजारच्याच बंगल्यात घरगडी म्हणून काम करतो. 17-18 वर्षे वय. चार वर्षांपूर्वी अभ्यास डोक्...