६ जून २०१८. मणिपूरच्या डोंगरांमधून बाहेर पडलो तेव्हा ४ दिवसांनी मोबाईलला रेंज मिळाली. गटाचा निरोप घेऊन एकट्यानेच परतीचा प्रवास सुरु केला. पुढचा मुक्काम नागालँडच्या दिमापूरला होता. इथल्या छात्रावासात १३ वर्षांपूर्वी राहिल्याच्या उत्कट आठवणी सोबत होत्या. तेव्हा दिमापूरमध्ये पावसाने चांगलाच झोडपून काढला होता आम्हाला. रेल्वे स्थानकावर स्थानिक गुंडांनी दिलेली दहशत अजूनही मनात ताजी होती. दिमापूर म्हणजे घटोत्कचाचे शहर. इथल्या राजबाडीतील दगडी प्यादे म्हणजे घटोत्कच आणि भीमाचा बुद्धिबळाचा पट होता म्हणे! त्या दिमापूरात मला आज एक महत्वाचं काम उरकायचं होतं - व्हिसाचा अर्ज. हो, एकीकडे निवांत भारतभ्रमण चालू असताना मी अजूनही व्हिसाचा अर्ज केला नव्हता. अमेरिकेची स्वप्नं काही अजूनही पडत नव्हती आणि व्हिसा म्हणजे तर शेवटचा प्रहार होता. तिथून माघार नव्हती. मग आज करू, उद्या करू, म्हणून टाळंटाळ चालली होती. पण आता अर्ज केला नाही तर तारीख मिळूनही वेळेत व्हिसा हातात येणार नाही हे लक्षात आल्यावर हे काम दिमापूरमध्ये पूर्ण करायचं असं ठरवूनच मणिपूर सोडलं होतं. गावभर फिरून शबनमचं मोठं खोकं खरे...